शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik ) यांनी मुख्यमंत्री, शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. प्रसारमाध्यमांतून हे पत्र प्रकाशित झाले आहे. या पक्षात महाविकासआघाडी सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच, शिवसेना-भाजप (Shiv Sena- BJP) यांच्यातील युती तुटली असली तरी, दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे संबंध आजही जिव्हाळ्याचेच आहेत. हे संबंध अधिक तुटण्याआधी भाजपशी जुळवून घेतलेले बरे, असा सल्लाही प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. सध्या या पत्रावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून शिवसेना कमकूवत करत आहेत. हे पक्ष जर शिवसेना कमकुवत करत असतील तर त्यापेक्षा भाजपसोबत जुळवून घेतलेलं बरं. भाजप-शिवसेना युती झाली तर फायदाच होईल. प्रामुख्याने प्रताप सरनाईक, अनिल परब आणि रवींद्र वायकर यांसारख्यांना नाहक होणारा त्रास तरी वाचेल, असेही या पत्रात म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. प्रताप सरनाईक यांनी 10 जून रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहिती आहे. दरम्यान, विविध प्रकरणात चौकशींचा ससेमिरा आपल्या पाठी लागू नये यासाठी अनेक राजकीय नेते, मंत्री आणि सनदी अधिकारी केंद्रात संधान बांधत आहेत, असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. (हेही वाचा, Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वबळाच्या घोषणेवरुन काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या टीका)
उद्धवजींच्या मार्गदर्शनात सगळे आले- अरविंद सावंत
आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र मी पाहिलेले नाही. परंतू, शिवसेना वर्धापन दिन नुकताच पार पडला. या वेळी केलेल्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी योग्य ते मार्गदर्शन आणि दिशादर्शन केले आहे. त्यात त्यांनी एक वाक्य वापरले जे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले 'शिवसेना कोणाची पालखी वाहणार नाही'. या वाक्यातच सगळे आले, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
आम्ही 18 महिन्यांपूर्वी तेच सांगत होतो- भाजप
प्रताप सरनाईक हे आज जे बोलत आहेत तेच आम्ही पाठिमागील 18 महिन्यांपूर्वी सांगत होतो. शिवसेना हा भाजपपेक्षा अधिक शिस्तिचा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षात वरिष्ठांनी घेतलेले निर्णय पाळले जातात. परंतू, घुसमट होत असेल तर किती काळ शांत बसायचे यालाही काही लिमीट असते. त्यामुळे त्यांनी ही भावना त्यांच्या उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली असेल. तळागाळातील शिवसैनिक आणि पक्षनेते यांचे म्हणने ऐकून जर शिवसेनेने निर्णय घेतला तर, आमचे नेतेही वर बसले आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यव्यक्त केली आहे.
ही काँग्रेसची पद्धत नाही- नाना पटोले
काँग्रेसने कधीच कोणाचा पक्ष फोडला नाही. ती काँग्रेसची पद्धत नाही. प्रताप सरनाईक यांच्या पत्राबाबत विचाराल तर तो त्यांच्या पक्षाचा व्यक्तिगत विषय आहे. आम्ही त्यावर बोलणार नाही. पक्षांतर्गत विषयात काय भूमिका घ्यायची हा त्यांचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
काही मतभेद असतील तर दूर केले जातील- राष्ट्रवादी
प्रताप सरनाईक यांच्या पत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे संबंध अतिशय चांगले राहिले आहेत. भाजपसोबत असताना अत्यंत वाईट वागणूक शिवसेनेला मिळत असे. त्यामुळेच शिवसेना त्यांच्यापासून दूरावली आहे. उलट महाविकासआघाडीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला ही असंख्य शिवसैनिकांसाठी आनंदाची बाब आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही एकमेकांचा चांगला आदर करतात. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतले जातील. जर कुठे फोडाफोडी होते आहे असे वाटत असेल तर, त्याबाबत विचारविनिमय केला जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.