मुंबई महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या त्यादृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) पक्षांमध्ये मदभेद पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून वारंवार काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचा उल्लेख केला जात आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वबळाच्या घोषणेवरुन काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.
शिवसेना 55 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले. तसेच त्यांनी स्वबळाच्या घोषणा करणाऱ्या काँग्रेसवरही अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. ते म्हणाले की, कॉंग्रेस नेते स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर करीत आहेत. ज्या लोकांमध्ये तलवार उचलण्याची ताकद नाही, ते स्वबळावर निवडणूक लढविण्याबद्दल बोलत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच लोकशाहीत प्रत्येक पक्षाला स्वबळावर निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- सारथी संस्थेच्या अडचणी संदर्भात बैठक पूर्ण, अजित पवार यांनी 13 मागण्या पूर्ण केल्याची संभाजीराजे छत्रपती यांची माहिती
नाना पटोले यांची प्रतिक्रिया-
“लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात नेमके कुणाला बोलले? हे स्पष्ट नाही. भाजपनेही स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे त्यांनी नेमके कुणाला बोलले याबाबत स्पष्टता नाही. त्यांच्या वर्धापन दिनाला आम्ही काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते या भाषणात शिवसेनेचे प्रमुख म्हणून बोलत होते. ही त्यांची स्टाईल आहे. ते नेमके कुणाला हे? स्पष्ट नाही”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरात असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यानी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाष्य केले होते. "महाराष्ट्रातील निवडणुकींबाबतचा अंतिम अधिकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे कोणी काहीही वक्तव्य करत असेल तर त्याला काही महत्व नाही", असे अजित पवार यांनी म्हटले होते.