Dr. Amol Kolhe | (Photo Credit : Facebook)

शिवसेना नेते (Shiv Sena Leader) अभिनेता डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) हे राष्ट्रवदी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) वाटेवर असल्याचे वृत्त आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र (Jai Maharashtra) म्हणत कोल्हे यांचा लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष कोल्हे यांच्याकडून मात्र या चर्चेबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रवादीच्या गोटातूनही कोल्हे यांच्या प्रवेशाबाबत अधिकृतपणे सांगण्यात आले नाही. दरम्यान, कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकाटावरुन शिरुर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha constituency) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2019) तिकिट मिळू शकते असा कयास आहे. मात्र, त्यालाही अद्याप दुजोरा मिळू शकला नाही.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत एका टीव्ही मालिकेतून डॉ. अमोल कोल्हे पहिल्यांदा घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली भूमिका आणि त्यांचा अभिनय अशा दोन्हींची तेव्हा महाराष्ट्रात प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी 2014 मध्ये शिवसेना पक्ष प्रवेश केला. शिवसेना हा पक्ष छत्रपती शिवरायांच्या विचारांना प्रमाण मानून चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आपण या पक्षात प्रवेश करतो आहोत, असे त्यांनी पक्षप्रवेश करताना सांगितले होते.

डॉ. अमोल कोल्हे हा शिवसेना पक्षाचा एक वलयांकीत चेहरा आहे. विविध चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाटकांमधून ऐतिहासीक भूमिका साकारल्यामुळे हा चेहरा अधिकच वलयांकीत झाला. सध्या ते स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या मालिकेत त्यांना साकारलेली छत्रपती संभाजी राजे यांची भूमिकाही प्रचंड लोकप्रिय ठरली. (हेही वाचा, डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश: महत्त्वाची कारणे)

शानदार वकृत्वशैली तिला असलेला अभिनयाचा बाज आणि ऐतिहासीक संदर्भ देत केलेली शब्दफेक हे कोल्हे यांच्या भाषणाचे खास वैशिष्ट्य आहे. कोल्हे यांचे भाषण ऐकण्यासाठी श्रोते नेहमीच उत्सुक असतात. शिवसेनेच्या अनेक कार्यक्रम आणि मेळाव्यांमध्ये कोल्हे यांचे भाषण हमखास असते. त्यामुळे अशा चेहऱ्याने शिवसेना सोडली तर त्या पक्षासाठी तो मोठा धक्का असणार आहे.