Bhavana Gawali On Shiv Sena: शिवसेना कोणाच्या बापाची नाही, वर्षानुवर्षे काम करुन पक्ष वाढवला- भावना गवळी
Bhavana Gawali (संग्रहित प्रतिमा)

शिवसेना (Shiv Sena) बंडखोर खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आज त्यांच्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या वेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा नामोल्लेख करत जोरदार टीका केली. आज आम्हाला गद्दार म्हटले जाते आहे. पण आम्ही गद्दार नाही आहोत. आम्ही पक्ष वाढवला आहे. आमच्या बापाने पक्ष वाढवला आहे. आमच्या बापाने पक्षासाठी काम केले आहे म्हणून पक्ष वाढला आहे. शिवसेना कोणाच्या बापाची नाही. आम्ही वर्षानुवर्षे काम करून शिवसेना वाढविली आहे, असेही त्या म्हणाल्या.

भावना गवळी या वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार आहेत. पाठिमागील वर्षभर त्या आपल्या मतदारसंघात फारशा फिरकल्या नाहीत. अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांनी आज वाशिम मतदारसंघात सभा घेतली. या वेळी त्या म्हणाल्या गद्दार आम्ही नाही आहोत. घरात बसून पक्ष वाढवता येत नसतो. आज त्यांनी 40 आमदार आणि 12 खासदार का सोडून गेले, याचे आत्मचिंतन करायला हवे. आम्ही पक्ष सोडला नाही आजही आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, असेही भावना गवळी म्हणाल्या. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)

भावना गवळी यांनी या वेळी सांगितले की, आजही आम्ही शिवसेनेतच आहोत आणि पुढच्या वेळीही आम्ही भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली. त्यासोबतच देवेंद्र फडणवीसही त्यांच्यासोबत होती. आम्ही अडचणीत असताना ज्यांनी आम्हाला मदत केली नाही त्यांची आज आठवनही काढू इच्छित नाही. गेली 25 वर्षे मी खासदार आहे. या काळात अनेक कामे केली. आजही काही कामे शिल्लख आहेत. ती कामेही आगामी काळात पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार भावना गवळी यांनी केला.