संजय राउत (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांतच विधानसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात सारेच पक्ष कामाला लागले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा 50-50 चा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र अद्याप शिवसेना-भाजपा युतीमध्ये सीट वाटपावरून ओढाताण सुरू आहे. आज (19 सप्टेंबर) शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी जागावटपामध्ये सेनेच्या वाट्याला 144 जागा न आल्यास युती तुटू शकते अशा आशयाचं वक्तव्य केलं आहे. काल शिवसेनेच्या दिवाकर रावते यांच्या वक्तव्याला पाठिंबा देताना राऊत यांनी हा मुद्दा उचलून धरत आगामी शिवसेना- भाजपा युतीच्या जागावाटपामध्येही 50-50 चा फॉर्म्युला वापरूनच जागा वाटप केले जावं असं म्हटलं आहे. विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेला 144 जागा न दिल्यास भाजप सोबत युती तुटण्याची शक्यता, दिवाकर रावते यांच्या विधानाने खळबळ

एबीपी माझाला खास मुलाखत देताना दिवाकर रावते यांनी सेनेला 144 न मिळाल्यास राज्यात युती होणार नाही असं म्हटलं आहे. त्यानंतर मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले, 'अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस यांनी 50-50 चा फॉर्म्युला ठरवला होता. मग दिवाकर रावते यांनी दिलेली प्रतिक्रिया काही चूकीची नाही. 'आम्ही निवडणूक एकसाथ लढवू का नाही लढणावर' असं म्हटलं आहे.

ANI Tweet  

भाजपा- सेना युतीमध्ये जागावाटपावरून वाद?

सध्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि काही मीडिया रिपोर्टनुसार, भाजपा कडून शिवसेना पक्षाला राज्यात 120 जागा देण्याची ऑफर आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा जागा आहेत. 44 जागा जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आली आहे. त्यामुळे 244 जागांचं वाटप करताना शिवसेनेने 144 जागांची मागणी केली आहे.

2014 विधानसभेदरम्यानदेखील अंतिम टप्प्यात भाजपा - शिवसेना यांची युती तुटण्याच्या उंबरठ्यावर होती. दोन्ही पक्षांनी निवडणूका वेगळ्या लढवल्या असल्या तरीही सरकार मात्र एकत्र बनवलं. 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा,शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.