Hemant Patil and Bhavna Gawali:  शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे, भावना गवळी यांचा पत्ता कट, एकनाथ शिंदे यांची 'ठाणे'दारी राहणार?
Eknath Shinde, Hemant Patil and Bhavna Gawali | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय जनता पक्षाने (BJP) टाकलेला दबाव की पक्षांतर्गत नाराजी याचे निटसे उत्तर पुढे आले नसले तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha Constituency) मतदारसंघातील घोषीत केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्कील ओढावली आहे. दुसऱ्या बाजूला वाशिम लोकसभा (Washim Lok Sabha Constituency) मतदारसंघातूनही विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिवसेना पक्षाने मोठा गाजावाजा करत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये हिंगोली येथून विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आयत्या वेळी पाटील यांची उमेदवारी मागे घेत तिथे बाबूराव कदम कोहळीक यांची उमेदवारी नव्याने जाहीर केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावर नामुष्की

हेमंत पाटील यांची उमेदवारी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून जाहीर झाल्यानंतर भाजप आणि काही प्रमाणात शिवसेना पक्षामध्येही रोष निर्माण झाला होता. त्यामुळे भाजपकडूनही पाटील यांची उमेदवारी बदलावी किंवा मागे घ्यावी याबाबत दबाव येत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून येत होते. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एकच दिवस राहिला असताना हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेत तिथे बाबूराव कदम कोहळीक यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दबावाखाली असल्याचे बोलले जात आहे. तसेच, भाजपच्या दबावाच्या चर्चेलाही अधिक बळकटी मिळू लागली आहे. (हेही वाचा, Unmesh Patil Quit BJP Join Shiv Sena (UBT): उद्धव ठाकरे यांचा भाजपला धक्का; उन्मेश पाटील यांचा शिवसेना (UBT) प्रवेश)

भावना गवळी यांचा पत्ता कट

वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी पाठिमागील अनेक वर्षांपासून लोकसभेवर शिवसेना पक्षाच्या वतीने प्रतिनिधीत्व करत आहेत. शिवसेना पक्षाचे नेतृत्वा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे होत तेव्हापासून वाशिम लोकसभा मतदारसंघातून अनेक वेळा भावना गवळी लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. आता निवडणूक आयोगाच्या कृपेने शिवसेना पक्षाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे. नेतृत्वात बदल होताच भावना गवळी यांचे तिकीट कापले गेले आहे. त्यामुळे वाशिम लोकसभा मतदारसंघात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेमंत पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवेळीही हे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत होते. मात्र, या शक्तीप्रदर्शनाचा काहीही उपयोग झाला नाही. पाटील यांची उमेदवारी मागे घेतली गेली ती गेली. त्यामुळे नाराज पाटील आता पक्षाचे काम करणार की, इतर पक्षाच्या पर्यायाचा मार्ग निवडणार याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला भावना गवळी यांनीही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तळ ठोकला होता. मात्र, त्यांचाही फायदा होऊ शकला नाही. गवळी यांचा पत्ता कटच झाला आहे. आतापर्यंत शिंदे गटातील तीन खासदारांचा पत्ता कट झाला आहे.