Shiv Sena Bhavan: सेना भवनाजवळ झालेल्या राड्यानंतर निलेश राणे यांची शिवसेनेवर जळजळीत टीका
Shiv-Sena Bhavan (Photo Credits-Twitter)

Shiv Sena Bhavan:  मुंबईतील दादर मधील शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना भवनाजवळ आज दुपारच्या वेळेस शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा सुद्धा आरोप केला जात आहे. यामुळे भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला. अशातच आता माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेवर जळजळीत टीका केली आहे.

निलेश राणे यांनी टिव्ही 9 या वृत्तवाहिनी सोबत बोलताना असे म्हटले की, मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली की नाही हे नक्की माहिती नाही. पण असे झाल्यास त्याचे जशाच तसे उत्तर मिळेल. हल्ला करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल असा इशारा सुद्धा निलेश राणे यांनी दिला आहे. दुसऱ्या बाजूला भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचे समजताच आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा हे माहिम पोलीस स्थानकात दाखल झाल्याचे दिसून आले.(Shiv Sena Bhavan: शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवन समोर राडा)

माहिम पोलिसांकडून 7 शिवसेनेचे नेते/कार्यकर्त्यांवर FIR दाखल करण्यात आला आहे. यांच्या विरोधात आयपीसी कलम 141,143,147,149,392,324,323,354 आणि 509 लावण्यात आले आहे. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आज शिवसेना भवनाजवळ झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Tweet:

तसेच भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सुद्धा ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले की, महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? काँग्रेस  राष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदीराचा त्रास होणारी आजची शिवसेना कुठे? सत्तेपाई सत्व गमावले

Tweet:

दरम्यान, भाजपच्या युवा मोर्चाकडून शिवसेना भवनाजवळ आंदोलन करण्यात येत होते. यावेळी अयोध्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप लावण्यात येत होता. त्याचवेळी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडल्याने वाद चिघळला गेला.