Shiv Sena Bhavan: शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवन समोर राडा
Protested Outside Shiv Sena Bhavan | ( Photo Credits: Twitter/ ANI)

मुंबई (Mumbai) येथील शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) परिसरात आज भाजप-शिवसेना (Shiv Sena-BJP ) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकमेकांना भिडले. अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीवरुन कथीत घोटाळ्यावरुन शिवसेनेने टीकास्त्र सोडले होते. त्याच्या निशेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhavan) फटकार मोर्चा काढण्यात आला होता. संभाव्य कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी हा मोर्चा शिवसेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवला. सर्व काही परिस्थिती निवळेल अशी स्थिती असतानाच भाजप-शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजप युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली या फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरु होताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतले. मोठ्या प्रमाणावर धरपकड केली. या प्रकारानंतर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले आहेत.

एएनआय ट्विट

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या सर्व प्रकारावरुन भूमिका व्यक्त करताना म्हटले आहे की, अशा प्रकारे आंदोलकांवर हल्ला करणे चुकीचे आहे. प्रसारमाध्यमं आणि पोलिसांसमोर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करुन कारवाई करावी. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर आमच्यावर कार्यकर्त्यांवर कारवाई करावी. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी.

शिवसेना प्रवक्ते सचिन अहीर यांनी या प्रकाराबद्दल बोलताना सांगितले की, शिवसेना भवन हे शिवसैनिकांचे मंदिर आहे. या मंदिरावर जर कोणी वाकडी नजर करुन पाहात असेल तर, अॅक्शनला रिअॅक्शन ही येणारच. आंदोलन कोणीही करावे. परंतू, एखाद्या पक्षाच्या मुख्यालयावर अशा प्रकारचे आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे, असा सवालही सचिन अहीर यांनी उपस्थित केला.