'मराठी बाणा' (Marathi Bana) या शब्दावरुन लोककलाकार अशोक हांडे आणि 'शेमारु' कंपनीत (Shemaroo Entertainment Limited) सुरु असलेल्या वादावर आज मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) सुनावणी झाली. या सुनावणीत अशोक हांडे (Ashok Hande) यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 'शेमारु'ने आपल्या नव्या वाहिनीच्या नावात 'मराठी बाणा' वापरण्यास हरकत नाही, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. ट्रेडमार्क कायद्यावरून अशोक हांडे यांनी 'शेमारु'विरोधात 200 कोटी रुपयांचा दावा केला होता.
'मराठी बाणा' ही भावना आहे. यात मराठी असल्याचा अभिमान दर्शवला जातो. तसेच यातून मराठी संस्कृती व अस्मितेचे दर्शनही होते. 19 व्या शतकापासून मराठी वाड्मयात 'मराठी बाणा' या शब्दांचा वापर होत आला आहे. त्यामुळे या शब्दांच्या वापरावर कोणीही आपला हक्क सांगू शकत नाही', असा युक्तिवाद सोमवारी 'शेमारू एंटरटेन्मेंट' कंपनीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला होता. त्यानंतर न्यायमूर्तींनी 'चौरंग' संस्थेच्या अर्जावरील अंतरिम निर्णय राखून ठेवत आज आदेश देऊ, असे स्पष्ट केले होते. (हेही वाचा - कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी दिला शिवजयंती 2020 निमित्त पर्यावरण पुरक संकल्प करण्याचा सल्ला, पहा ते काय म्हणाले?)
'शेमारू एंटरटेन्मेंट' कंपनीने जानेवारी महिन्यात 'शेमारू मराठी बाणा' ही नवी मराठी दूरचित्र वाहिनी सुरू केली आहे. यावर 'चौरंग'चे प्रमुख अशोक हांडे यांनी अॅड. राजेंद्र पै यांच्यामार्फत दावा दाखल करण्यात आला होता. तसेच शेमारू कंपनीला 'मराठी बाणा' नाव वापरण्यास मनाईचा आदेश द्यावा, अशी विनंतीही हांडे यांनी केली होती. मात्र, आज मुंबई उच्च न्यायालयाने 'शेमारु'ने आपल्या नव्या वाहिनीच्या नावात 'मराठी बाणा' वापरण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे 'शेमारू एंटरटेन्मेंट' कंपनी मोठा दिलासा मिळाला आहे.