NCP Chief Sharad Pawar (Photo: Facebook)

कोरेगाव- भीमा हिंसाचार प्रकरणाची (Koregaon Bhima Case) चौकशी करणाऱ्या आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना या प्रकरणात साक्षीसाठी बोलावण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल (JN Patel) यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची (Elgar Council) चौकशी करण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हेतर त्यांच्याकडे कोरेगाव-भीमा प्रकरणाची महत्वाची माहिती असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना अनेकदा सांगितले आहे. शरद पवार यांनी न्यायालयालाही माहिती दिली होती.

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. शरद पवार यांनी भीमा कोरेगाव-एल्गार याबाबत अनेकदा त्यांची मत व्यक्त केली आहेत. 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार झाला. त्यापूर्वी एक दिवस अगोदर पुण्याच्या शनिवार वाड्यावर झालेल्या 'एल्गार परिषदेचे आयोजन हे हिंसेचे मूळ कारण आहे. एल्गार परिषदेत गावकऱ्यांना भडकवण्यात आले होते. त्यामुळे हा वाद पेटला होता असेही शरद पवार यांनी सांगितले होते. दरम्यान, संभाजी भिडे यांनी काही जणांसोबत आजूबाजुच्या गावांमध्ये वेगळे वातावरण निर्माण केले होते. संभाजी महाराजांची समाधी उद्ध्वस्त करण्यात आली, त्याचा परिणाम संघर्षात झाला, असा आरोपही शरद पवार केला आहे. तसेच त्यामागे काय वस्तूस्थिती आहे, ते आज ना उद्या बाहेर येईल, असेही ते म्हणाले होते. यासाठी आगामी काही दिवसांमध्येच आयोगाकडून शरद पवार यांना साक्षीबाबत समन्स पाठवण्यात येईल. याआधी शरद पवार यांनी चौकशी आयोगासमोर स्वतः एक प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. त्यानंतर त्यांना साक्षीसाठी बोलवावे, अशी मागणी करण्यात आली. हे देखील वाचा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी निवड; राज्य गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कौतूकाचा वर्षाव

दरम्यान, शरद पवार यांनी सातत्याने भीमा कोरेगाव प्रकरणावर भूमिका घेत पुणे पोलिसांच्या तपासावर आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनाही या प्रकरणात साक्षीसाठी बोलवावे अशी मागणी होत होती. स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील हीच मागणी केली होती.