Sharad Pawar And Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

Sharad Pawar And Uddhav Thackeray Meet: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा जवळपास महिन्याभरापासून सुटलेला नाही. परंतु सध्याच्या राजकीय हालचालींकडे पाहून हा तिढा लवकरच सुटेल अशी चिन्हं दिसत आहेत. महाआघाडीच्या कित्येक बैठकांनंतर, अखेर शिवसेनेला साथ द्यायची असा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच शरद पवार आणि सोनिया गांधी यांची देखील दिल्लीत बैठक झाली.

परंतु आज झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील बैठकांवरून लवकरच एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळेल असं दिसून येत आहे. तसेच उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक होणार असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईतील या बैठकीनंतरच अखेरचा फैसला होईल हे नक्की.

या बैठकीदरम्यान नव्या मुख्यमंत्र्यांनी 27 नोव्हेंबरपर्यंत शपथ घ्यावी अशी चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, या तारखेवर शिक्कामोर्तब झाले नसून ते उद्याची बैठक संपली की मगच अंतिम ठरेल.

काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाशिवआघाडी येत्या सोमवारी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. राज्यपाल 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी दिल्लीला जाणार असल्याने ते सोमवारी येताच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येऊ शकतो.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाशिवआघाडी मध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि 'हे' असतील महाराष्ट्राचे संभाव्य मंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे राहणार असल्याचे अनेक बड्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तर उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचं नाव सध्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे तर अजित पवार यांचंकडे उपमुख्यमंत्री पद येऊ शकते.