शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकी करत 'महाशिवआघाडी' हे नवं सरकार लवकरच स्थापन करण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. पुढील 2 ते 3 दिवसात सत्ता स्थापनेच्या या संघर्षाला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे कारण दिल्लीतही तशाच हालचाली पाहायला मिळत आहेत. शरद पवार यांची सोनिया गांधींशी झालेली भेट, काँग्रेसचे बडे नेते महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी करत असलेल्या चर्चा यावरून हे स्पष्ट होताना दिसत आहे. पण हे सरकार बनलंच तर कोणत्या पक्षाकडे कोणती खाती जाणार आणि कोणाचा मुख्यमंत्री किती काळ होणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पण ते जाहीर होण्याआधीच आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत 'महाशिवआघाडी' ची ही संभाव्य मंत्र्यांची यादी.
राष्ट्रवादीच्या यादीतील प्रमुख नाव ठरेल अजित पवार यांचं. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दुसरं महत्त्वाचं असं अर्थ खातं सोपवण्यात येऊ शकतं तर नवाब मलिक यांना कामगार मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. इतर मंत्रालयीन खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही बंदी नावं म्हणजे छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडेही जाऊ शकतात.
काँग्रेस पक्षातील खाते वाटप बघता बाळासाहेब थोरात यांना प्रमुख असं महसूल खातं मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसमधील विश्वजीत कदम, विजय वडेट्टीवार यांना देखील काही महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार? पाहा 'या' व्यक्तीने कशाबाबत व्यक्त केली नाराजी
शिवसेनेकडेच मुख्यमंत्री पद राहणार असं दिसतंय आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असण्याची दाट शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खातं जाऊ शकतं आणि राजन विचारे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे खातं जाऊ शकतं.