Police Case Against Uddhav Thackeray: शिवसेना पक्षाने आपल्या मित्रपक्ष भाजपशी काडीमोड करत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांशी हातमिळवणी केली. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने आपल्या पूर्णपणे विरोधी विचारांच्या पक्षांशी मैत्री केल्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत. एका व्यक्तीने तर शिवसेनेवर नाराजी पत्करत चक्क उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेला दिलेलं मत फुकट गेलं असा मत त्याने व्यक्त केलं आहे.
औरंगाबाद मधील बेगमपुरा येथे राहणारे रत्नाकर भीमराव चौरे (वय-34) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. इतकंच नव्हे तर या तक्रार पत्रात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नावांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
तक्रारदार रत्नाकर चौरे यांच्या आरोपानुसार, विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची महायुती होती. पण आता सेनेने मात्र भाजपपासून वेगळं होत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. याचमुळे त्यांना त्यांची सेनेकडून फसवणूक करण्यात आली असल्याचे वाटत आहे.
त्यांनी तक्रार पत्रात असेही म्हटले आहे की, 'उद्धव ठाकरे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांनी 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला होता. हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी शिवसेना आणि भाजप महायुतीला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळेच मी व माझ्या कुटुंबाने त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेऊन महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान करुन निवडून दिले.
दरम्यान गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला राज्यातील सत्ता स्थापनेचा संघर्ष अद्यापही सुटलेला नाही. पण लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष सरकार स्थापन करतील अशी शक्यता आहे.