NCP Chief Sharad Pawar (File Photo)

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा (NCP Mahila Melava) आज मुंबई येथे पार पडला. या मेळाव्यात शरद पवार यांनी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला. समाजात अनेक ठिकाणी चुकिच्या गोष्टी घडतात. जर काही चुकीचे दिसले तर महिलांनी रस्त्यावर यायला हवे. जर काही गुन्हे दाखल झाले, खटले भरले गेले तर घाबरण्याचे कारण नाही. आपलं सरकार आलं की हे खटले मागे घेऊ, पण आता मागे हटायचं नाही, अशा शब्दात पवार यांनी महिलांना पॉवरफूल सल्ला दिला. याच वेळी त्यांनी अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे अवाहनही केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, रोहिणी खडसे, यांच्यासह इतरही अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होते. मेळावा अनेक तासझाले सुरु आहे. पण इतका वेळ होऊनही कोणीही सभागृहाबाहेर गेले नाही. सर्वांनी आपापली भूमिका मांडली. परस्परांची भूमिकाही ऐकूण घेतली. आपणच आरक्षणाचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सिद्ध झालं की, महिला पुरुषांपेक्षा कोठेही कमी नाहीत.

सरकार शिक्षणासंदर्भातही भलतेच निर्णय घेत आहे. सावित्रिबाई फुले यांनी समाजाचा विरोध असताना शाळा काढली. आता त्या शाळा बंद करणं योग्य नाही. तसे घडले तर गोरगरीब जनतेचं शिक्षण होणार नाही. सरकार या शाळा खासगी उद्योजकांना चालविण्यास देत आहे. त्याने त्या शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला. समाजात अशा गोष्टी घटत असताना तुम्ही शांत बसता. हे योग्य राहणार नाही. एका बाजूला सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रचंड कमतरता आहे. दुसऱ्या बाजूला रिक्त जागा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी आपण आवाज उठवायलाच पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, याच मेळाव्यादरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका विधानामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला राज सुरु होणार का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्याचे झाले असे की, पक्षाच्या महिला मेळाव्याला सुरुवात होण्यापूर्वीच पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम, दौरे आखत असताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही. त्यामुळे महिलांना पक्षात काम करणे कठीण होते, अशी नाराजी महिला पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. त्यावर यापुढे महिला अध्यक्ष माझ्यासोबत वाहनातून प्रवास करतील. तसेच, माझ्या कार्यक्रमांमध्ये महिलांचा थेट सहभाग असेल असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.