S Jaishankar (फोटो सौजन्य - X/@DrSJaishankar)

India-Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष वाढत होता. आता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा करार (India-Pakistan Ceasefire) झाला आहे. 12 मे रोजी दोन्ही देश पुन्हा या मुद्द्यावर चर्चा करतील. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारची लढाई होणार नाही, असे भारताकडून सांगण्यात आले आहे. आता, दोन्ही देशांमधील युद्धबंदीवर, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत दहशतवादावर कोणतीही तडजोड करणार नाही, असं परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.

लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत - एस जयशंकर

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि अटल भूमिका कायम ठेवली आहे. यापुढेही भारताची अशीच भूमिका असेल.' (वाचा - India-Pakistan Conflict: भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमत; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान)

रत दहशतवादावर कोणतीही तडजोड करणार नाही - 

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत भारत-पाकिस्तान युद्धबंदीची माहिती दिली होती. दोन्ही देशांमधील दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी असेही म्हटले आहे की, गेल्या 48 तासांत उपराष्ट्रपती व्हान्स आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीवर एक करार झाला.