NCP News: अजित पवार यांच्या बंडामुळे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता महिला राज (Mahila Raj) येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक पदाधिकारी मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्याला सुरुवात होण्यापूर्वीच पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम, दौरे आखत असताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही. त्यामुळे महिलांना पक्षात काम करणे कठीण होते, अशी नाराजी महिला पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. त्यावर यापुढे महिला अध्यक्ष माझ्यासोबत वाहनातून प्रवास करतील. तसेच, माझ्या कार्यक्रमांमध्ये महिलांचा थेट सहभाग असेल असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे यांनी जवळपास आपला निर्णयच जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला राज येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सुळे यांनी म्हटले की, आगामी काळात राज्यात दोन महत्त्वाच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी पुढचे 12 महिने अतिशय महत्त्वाचे आहेत. एक काळ होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले की, काहीतरी भूकंप होणार असे मानले जायचे. आता परिस्थिती तशी नाही. राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरवायलाही दिल्लीला जावे लागते. ही वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
पुणे मेट्रोवरुन बोलतान त्यांनी सांगितले की, पुणे मेट्रोला माझा विरोध नाही. पण पीएमटी एसटी महामंडळ आगोदर चांगलं केलं असत तर अधिक चांगले झाले असते. नागपूरमध्ये मेट्रो सुरु केली. ती मेट्रो तोट्यात आहे. आता तिथे फॅशन शो, वाढदिवस साजरा कारवा लागतो. हे सरकार काय धोरणाने काम करते ते कळत नाही. शाळा बंद झाल्या आणि दारुची दुकाने वाढत आहे. सरकार फक्त बॅनरबाजी करण्यात मग्न आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या भारती जनता पक्षाकडे हुशार माणसं नाहीत. त्यांच्या पक्षात राज्यकारभार चालवण्यायोग्य लोकंच नाहीत. त्यामुळे त्यांना इतर पक्षातून माणसे बोलवावी लागतात. पक्ष फोडावे लागतात. दरम्यान, अजित पवार गटाकडून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरल्याबद्दलही सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. चव्हाण साहेबांचे फोटो वापरत असतील तर चांगले आहे. त्यांचे हेगडेवार कमी होत आहेत, असे त्या म्हणाल्या. त्यांनी भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटावर जोरदार निशाणाही साधला.