Sharad Pawar on Basavaraj  Bommai Remarks: 'बेळगाव, कारवार, निपाणी सोडणार असाल तरच चर्चा', शरद पवार यांचा कर्नाटकला सज्जड इशारा; राज्यपालांवरही निशाणा
Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या विधानावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला आहे. नुकताच त्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांतील काही गावांवर हक्क सांगितला. त्यावरुन राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही तीव्र प्रतिक्रिया (Sharad Pawar on Basavaraj Bommai Remarks) दिली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कारणाशिवाय वाद वाढवत आहेत. जर बेळगाव, कारवार, निपाणी सोडणार असाल तरच दोन्ही राज्यांच्या सीमाप्रश्नी चर्चा होऊ शकते, असा सज्जड इशाराच शरद पवार यांनी कर्नाटकला दिला आहे. शरद पवार हे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपला जबाबदारी टाळता येणार नाही

शरद पवार यांनी भाजपवरही या वेळी निशाणा साधला. सीपाप्रश्नी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या विधानावरुन भाजपला जबाबदारी टाळता येणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान गंभीर असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच, तेथील नागरिकांची इच्छा कर्नाटकमध्ये जाण्याची असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता, शरद पवार म्हणाले, स्थानिक नागरिकांची इच्छा काय आहे याबाबत मला माहिती नाही. त्यामुळे मला त्यावर भाष्य करता येणार नाही. (हेही वाचा, Bhagat Singh Koshyari Controversial Statement: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “शिवाजी जुन्या काळातले आदर्श”)

आत्मविश्वासाचा अभाव असला की तांत्रिकाची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांत्रिकाची भेट घेतल्याची प्रसारमाध्यमांतून चर्चा आहे. या चर्चेवरुन प्रसारमाध्यमांनी विचारले असता 'आत्मविश्वासाचा अभाव असला की तांत्रिकाची भेट घेतली जाते', असा टोलाच पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. राज्यात सत्तेचा गैरवापर होत आहे. सत्तेच्या जोरावर आमच्या लोकांना तुरुंगात टाकले जात आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

राज्यपालांच्या विधानाची राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दखल घ्यावी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. या पदावर असलेल्या व्यक्तीने काळजीपूर्वक आणि जपून बोलायला हवे. तरीही अशा पदावर असेलल्या व्यक्तीकडून अशी विधाने होत असेल तर हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेले उद्गार, तसेच त्यांनी या आधीही महात्मा फुले आणि सावित्रिबाई फुले यांच्याबद्दल काढलेले उद्गार पाहता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच याबाबत दखल घ्यावी. त्यांना राज्याच्या राज्यपाल पदावरुन हटवावे, अशी मागणी शरद पवार यांनी या वेळी केली.