Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन (Sharad Pawar Faction Merging Congress) होणार, अशी चर्चा प्रसारमाध्यमांतून अचानक सुरु झाली. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मात्र, या वृत्ताचे तातडीने खंडण करत या चर्चा आणि वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे शरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) तातडीने स्पष्ट केले आहे. पवार गटाची एक तातडीची बैठक पुणे शहरात पार पडली. या बैठकीच्या अनुषंघाने अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, त्यावर पक्षाकडून अधिकृतरित्या वेळीच भाष्य करण्यात आल्याने या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे पुढे आले.

'विलीन होण्याच्या चर्चा निराधार'

शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रासरमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा एकदम चुकीच्या आहेत. आज जी तातडीची बैठक होती ती वेगळ्या मुद्द्यावर होती. लवकरच आमचा महाविकासआघाडी म्हणजेच इंडिया आघाडीचा एक मेळावा पुणे येथे पार पडतो आहे. या मेळाव्याच्या तयारीच्या अनुषंघाने चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कोणत्याही प्रकारे विलीनीकरणाच्या शक्यता, विषय याबाबत चर्चा झाली नाही, असे देशमुख यांनी सांगितले. (हेही वाचा, Sharad Pawar Party Name: शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाले पक्षाचे नाव घ्या जाणून)

'विलीनीकरणाबातब कोणत्याही प्रकारचा विचार नाही'

प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी शरद पवार यांच्या सूचनेवरुनच आपणाशी बोलायला आलो आहे. प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेस पक्षातील विलीनीकरणाबातब कोणत्याही प्रकारचा विचार नाही. केवळ लोकांमध्ये दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे वृत्त प्रसारमाध्यमांतून दिले जात आहे. शरद पवार हाच आमचा पक्ष आणि चिन्ह आहे. जनमानसातही त्यांची आज छाप आहे. असे असताना ज्यांना शरदचंद्र पवार या नावाची भीती वाटते तेच लोक अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवण्याचे काम करत आहे, असे जगताप म्हणाले. (हेही वाचा, Sharad Pawar On BJP: शरद पवार यांचे भाजपच्या दाव्याला वस्तुनिष्ठ उत्तर, म्हाणाले 'कशाच्या जोरावर येणार 450 जागा')

काँग्रेसकडून ऑफर?

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात, काँग्रेसकडून शरद पवार गटाला मोठी ऑफर गेल्याचे वृत्त आहे. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत सोबत लढण्यापेक्षा पक्षच विलीन करा एकाच चिन्हावर एकत्र लढू असा प्रस्ताव काँग्रसकडून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी म्हणजेच शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी अधिकृतरित्या यावर कोणतेही भाष्य केले नाही. उलट या वृत्ताचे खंडणच केले आहे. दरम्यान, असे कोणत्याही प्रकारे विलीनिकरण झाले तरी भाजपला काहीही फरक पडत नसल्याचे, विधानसभा आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.