NCP Vs NCP: महाराष्ट्राचा विकास हेच माझं स्वप्न आहे. या विकासासाठीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून हा निर्णय घेतला आह. राज्यामध्ये माझी एक कडक नेता म्हणून प्रतिमा झाली आहे. परंतू माझे कामाला प्राधान्य असते. जातीपातीचं राजकारण मला जमत नाही. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणूनच विकासाच्या दृष्टीकोणातून आपण राज्यासोबत जाण्याचा विचार केला. या आधीही आपण अशा अनेक भूमिका घेतल्या आहेत. मग आताच आपण घेतलेला निर्णय काही वेगळी भूमिका आहे असे मानण्याचे कारण नाही, असे म्हणत अजित पवार यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. 2004 मध्ये जर आपण योग्य संधीचा फायदा घेतला असता तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता. तेव्हा जर मुख्यमंत्री झाला असता तर आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री दिसला असता, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.
मुंबई येथील एमइटी संस्थेमध्ये आयोजित समर्थकांच्या बैठकीत अजित पवार बोलत होते. आपल्या संबंध बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही. मात्र, आपली स्पष्ट भूमिका आणि शरद पवार यांच्या एकूण राजकारणाचे वाभाडे काढले. सन 2019 मध्येच राष्ट्रवादी आणि भाजप यांचे सरकार स्थापन करण्यासाठी सुरुवातीला भूमिका घेतली. म्हणूनच मी आणि वानखेडेवर गेलो. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन शपथ घेतली. पुढे जाऊन अचानक काही तासात भूमिका बदलली. मला माघार घ्यावी लागली. त्यानंतर लगेचच जाऊन शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले. तेव्हा शिवसेना जातीयवादी राहीला नाही? राजकारणामध्ये सारखी भूमिका बदलून चालत नाही. राजकारण असं चालंत नाही, असा टोलाही अजित पवार यांनी शरद पवारांना लगावला. (हेही वाचा, NCP Crisis: शरद पवार येत्या 8 जुलै रोजी घेणार पहिली सभा; ठिकाणही ठरलं, मातब्बर नेत्याला हादरा; घ्या जाणून)
'तर पवारांची औलाद सांगणार नाही'
मी महाराष्ट्रासमोर खोटं बालणार नाही. जर खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही. पण मला म्हणायचं आहे. तुम्ही आमचे श्रद्धास्थान आहे. आम्हाला वाटतं तुम्ही शतायुषी व्हावं. पण तुम्ही कधी थांबणार आहात की नाही. वय वर्षे साठ झालं की, लोक आपल्या मुलाला, घरातल्या कर्त्या मुलाला जबाबदारी देतात. मग आता तुम्ही ऐंशी, बेएंशी वर्षाचे झालात. तर तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा थेट सवालही अजित पवार यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे विचारला.