Sharad Pawar | (Photo Credits: X)

लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये 400 जागा जिंकल्या जातील असा दावा भारतीय जनता पक्ष (BJP) करतो आहे. मात्र, या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गणिती पद्धतीने उत्तर दिले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपविरोधी वातावरण आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये तर त्यांची नावालाही सत्ता नाही. ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यांमध्ये विरोधकांचीही ताकद आहे, असे असताना कोणत्या आधारावर आपण 400 जागा येतील असे म्हणता? असा थेट सवालच शरद पवार यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय शिबीर शिर्डी येथे पार पडले. या शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

'देशामध्ये भाजप सांगतो तशी परिस्थिती नाही'

पाठिमागच्या काही काळापासून कार्यकर्ते अस्वस्थ होते. या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देशामध्ये भाजप सांगतो तशी परिस्थिती नाही. ही वस्तुस्थिती भाजपला माहिती आहे. म्हणूनच भाजप देशातील अनेक राज्यांमध्ये असलेल्या विरोधकांची सरकारे पाडतो आहे. काही राज्यांमध्ये भाजप आहे. तो तिथे बहुमताने सत्तेत आहे. मात्र, अनेक ठिकाणी त्यांना विरोधकांची सरकारे पाडून किंवा विरोधी पक्ष फोडून सत्ता स्थापन करावी लागत आहे. भाजप केवळ आक्रमक प्रचार करते आहे. जर्मणीत हिटलरने जशी आक्रमक यंत्रणा उभारली होती. तशीच आक्रमक यंत्रणा यांच्याकडेही आहे. केवळ त्याच जोरावर ते प्रचार करत आहेत, असेही शरद पवार यांनी या वेळी ठासून सांगितले. (हेही वाचा, Prakash Ambedkar In I-N-D-I-A: प्रकाश आंबेडकर 'इंडिया' आघाडीत? शरद पवार काय म्हणाले? घ्या जाणून)

'देशभरातील वातावरण भाजपसाठी बिलकूलही अनुकूल नाही'

देशभरातील वातावरण भाजपसाठी बिलकूलही अनुकूल नाही. गोव्यामध्ये त्यांनी फोडाफोडी करुन सरकार स्थापन केले, महाराष्ट्रातही तशीच स्थिती आहे. इतर राज्यांमध्येही त्यांचे प्रयत्न सुरुच आहेत. अशा स्थितीमध्ये लोकसभा निवडणूक 2024 मध्ये  400 जागा जिंकण्याच्याभाजपच्या  द्याव्यामध्यो कोणतेही तथ्य नाही. भाजपने लोकांची फसवणूक केली आहे. भाजपने तोंडाला येतील त्या घोषणा केल्या आहेत. ते कोणतीही घोषणा करतात. त्या घोषणा ऐकून त्याचेही खासदार धक्क होतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु असे अश्वासन दिले होते. पण तसे झाले नाही. शहरी भागातील लोकांना घरं देऊ असेही ते सांगतात. पण, तिथेही तसं झालं नाही. त्यांच्या धोरणातील फोलपण आता लोकांना दिसू लागला असल्याचे सांगत पवारांनी भाजपच्या उणिवांकडे लक्ष वेधले. (हेही वाचा, Sharad Pawar on Ajit Pawar: 'तक्रार एकच आहे', शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल सांगितली मनातली गोष्ट)

महागाई, बेरोजगारी वाढली

संसध्यमध्ये काही तरुणांनी घुसखोरी केली. त्यांना पकडलं गेलं तेव्हा त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांबद्दल संसदेत प्रश्न विचारले म्हणून तब्बल 140 खासदारांना एकावेळी निलंबीत करण्यात आले. ही दडपशाही आहे. महागाई, बेरोजगारी यांसारख्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांविषयी संसदेत आवाज उठवला तरीसुद्धा खासदारांना निलंबीत केले जाते. आज गॅसचा दर 1110 रुपयांवर पोहोचला आहे, याकडे लक्ष वेधत शरद पवार म्हणाले, देशातील 54% जनता शेतीवर अवलंबून आहे. असे असताना भाजपचे धोरण मात्र शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. शेतीची अवस्था बिकट झाल्याने शेतकऱ्यांची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे, याबाबत घराघरात जाऊन जनजागृती करण्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.