Sharad Pawar | Twitter

अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी ही भाजप आणि एनडीए विरोधात विरोधकांनी उभारलेल्या 'इंडिया' (I.N.D.I.A. ) आघाडीचा एक घटक होणार का? याबाबत उत्सुकता अद्यापही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (लमज) पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या माहितीमुळे ही उत्सुकता आणखी वाढली आहे. आंबेडकर यांना इंडिया आघाडीत सहभागी करुन घ्यायला हवे, असे मी स्वत: काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खडगे यांना सांगितले आहे. मात्र, प्रत्येकाला आपापले निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पुणे येथे आयोजित भीमथडी यात्रेला (Bhimthadi Jatra Pune) हजेरी लावली असता पवार पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

VBA साठी आघाडी दूरच

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन महाविकासआघाडीने एक वेगळा प्रयोग करावा अशी भूमिका राजकीय वर्तुळातील विविध प्रवाहांनी या आधीच घेतली आहे. मात्र, असे असले तरी या ना त्या कारणाने हे समिकरण जुळले नाही. महाविकासआघाडीला आता काहीसे व्याप्त स्वरुप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचीच पुढची पायरी इंडिया आघाडीत पाहायला मिळते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या आघाडीत तरी व्हीबीएला स्थान मिळेल. पण, अद्याप तरी तसे घडताना दिसले नाही. त्या उलट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिपण्णीच पाहायला मिळते आहे. (हेही वाचा, Prakash Ambedkar on Mohan Bhagwat: प्रकाश आंबेडकरांचा इशारा, '..तर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू')

प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस, NCP वर टीका

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली होती की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळे वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत समाविष्ट करुन घेतले जात नाही. अद्यापपर्यंत जरी काँग्रेस राष्ट्रवादीने विचार केला नसला तरी इंडिया आघाडीकडून आम्हाला सहभागी करुन घेतले जाईल. (हेही वाचा, Ajit Pawar on Amol Kolhe: अजित पवार गटाचा शिरुर लोकसभा मतदारसंघावर दावा, अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार उतरवणार)

सुजात आंबेडकर यांचा इशारा

दुसऱ्या बाजूला, सुजात आंबेडकर यांनी थेट संघर्षाची भूमिका घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्देशून म्हटले होते की, आम्ही तुम्हाला संधी दिली होती. पण, ती तुम्ही घेतली नाही आता पुन्हा रडत येऊ नका. जर रडत आला तर ठोकून काढू. नांदेड जिल्ह्यातील कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निर्धार मेळाव्यात सुजात बोलत होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांना पत्र लिहून प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, काँग्रेसद्वारे त्यावर अद्यापही कोणतीही भूमिका घेण्यात आली नसल्याचे सुजात म्हणाले.

दरम्यान, येत्या 26 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीने राज्य कमिटीची एक बैठक बोलावली आहे. ही बैठक तातडीची असून आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या दृष्टीने राज्यातील किमान 30 जागा लढण्यावर या बैठकीत विचार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.