Sharad Pawar On BJP & Ajit Pawar Faction: आम्हाला सत्तेची भूक नाही,आम्ही लोकांसाठी काम करत राहू. जे लोक सत्तेसाठी तिकडे गेले आहेत त्यांची भूमिका योग्य नाही. त्या लोकांना माहिती आहे, त्यांचं नाणं खाणकन वाजत नाही. त्यांना ते माहिती आहे, त्यामुळेच ते माझे फोटो वापरत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथून घणाघात केला आहे. एका बाजूला विठ्ठल म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं, असं सांगत बासायचे हे धोरण चुकीचे आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले. वायबी सेंटर येथे समर्थकांच्या बैठकीत ते मुंबई येथे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भ्रष्टाचारी असल्याचे सांगता मग त्याच पक्षाच्या लोकांना सत्तेत कसे घेतले? असा सवालही शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विभाजनाचा निर्णय काही लोकांनी घेतला. तो निर्णय घेताना त्यांनी आम्हाला काहीही सांगितले गेले नाही. बरं गेले ते गेले आणि थेट पक्ष आणि चिन्हावर दावा सांगत आहेत. पण, पक्षाचे चिन्ह आमच्याकडेच आहे. ते कोठेही जाणार नाही. पण, मी लोकांना सांगून ठेवतो. निवडणुकीमध्ये चिन्ह जरी बदललं तरी फरक पडत नाही. पक्ष चिन्हामुळे नाही तर पक्षाच्या विचारांमुळे चालतो. त्यामुळे पक्षाचे चिन्ह आमच्याकडे आहे, ते कुठेही जात नाही. ज्यांनी आम्हाला सत्तेत आणले ते जनता आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत, असे शरद पवार म्हणाले. (हेही वाचा, NCP Crisis: शरद पवार येत्या 8 जुलै रोजी घेणार पहिली सभा; ठिकाणही ठरलं, मातब्बर नेत्याला हादरा; घ्या जाणून)
ट्विट
You (BJP) called the NCP corrupt. So, why have you allied with the NCP now?...Whatever happened to Uddhav Thackeray has been repeated: NCP chief Sharad Pawar in Mumbai pic.twitter.com/SEx8cQ6N91
— ANI (@ANI) July 5, 2023
आज संपूर्ण देश आमच्याकडे पाहत आहे. राष्ट्रवादीसाठी ही सभा ऐतिहासिक आहे. आमच्या मार्गात अडथळे असूनही आम्हाला वाटचाल करत राहावे लागेल. आम्हाला सत्तेची भूक नाही. आम्ही लोकांसाठी काम करत राहू. त्यांना (अजित पवार) काही अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते. त्यांच्या मनात काही असेल तर ते माझ्याशी संपर्क साधू शकले असते, अशी खंतही शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केली.