हालाखीची आर्थिक परिस्थिती असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बारामती मध्ये एका मुलाने मनात जिद्द ठेवत अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न अखेर पूर्ण केले आहे. शंकर रामचंद्र चव्हाण (Shankar Ramchandra Chavan) असं या मुलाचं नाव असून आयआयटी गुवाहाटी नंतर आता शंकर MS करण्यासाठी थेट अमेरिकेला जाणार आहे.
शंकरचे वडील गवंडी कामगार आहेत. उपजीविकेसाठी ते तेलंगणामधून बारामती मध्ये आले आणि स्थायिक झाले. स्वतः अशिक्षित असूनही त्यांनी मुलगा शंकर याला शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलानेही बापाच्या कष्टाचे चीझ केले आहे.
प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये मुलाला शिकवण्यासाठी शंकरच्या वडीलांना रोज काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. शंकर रामचंद्र चव्हाण हा आयआयटी गुवाहाटी मधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन चे शिक्षण घेऊन पदवीधर झाला. आता त्याला अमेरिकेतील न्युयॉर्क मध्ये शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्याला स्कॉलरशीप मिळणार असून त्याच्या जोरावर तो एम एस करण्यासाठी निघाला आहे.
पहा सुप्रिया सुळे यांचं ट्वीट
बारामती येथील शंकर रामचंद्र चव्हाण या तरुणाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळवली आहे. त्याचे आई वडील मजूरी करतात. या परिस्थितीतही त्याने मिळविलेले हे यश प्रेरणादायी आहे. या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप…
— Supriya Sule (@supriya_sule) August 17, 2023
दरम्यान बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शंकरच्या या प्रेरणादायी प्रवासाची दखल घेतली आहे. ट्वीट करत त्यांनी शंकरचे अभिनंदन देखील केले आहे.