
महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ एक्सप्रेसवेविरोधात (Shaktipeeth Expressway) शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देत आहेत. बुधवारी शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर निदर्शने केली आणि शक्तीपीठ महामार्गाविरुद्ध सर्व 12 जिल्ह्यांतील शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला. पुढील रणनीती आखण्यासाठी 8 एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यात बैठक बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे, आझाद मैदानावर शेतकरी आंदोलन करत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवन परिसरात शक्तीपीठ महामार्गाचे फायदे सांगितले. महाराष्ट्रासाठी शक्तीपीठ महामार्ग किती महत्त्वाचा आहे हे सांगत, मुख्यमंत्र्यांनी शाकीपीठ महामार्ग होणारच असे ठामपणे सांगितले.
या महामार्गाच्या बांधकामानंतर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाने ज्याप्रमाणे 12 जिल्ह्यांचे जीवन बदलले, त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग देखील मोठा बदल घडवून आणेल. या महामार्गामुळे सोयीस्कर आणि जलद वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, ज्यामुळे व्यवसाय आणि उद्योगांना फायदा होईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून या महामार्गासाठी जागा देण्याची तयारी दाखवली आहे. कोल्हापूरच्या एअरपोर्टवर एक हजार शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले, ज्यात महामार्गाचे समर्थन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी चर्चा करू, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. पण हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो होणारच, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या महामार्गामुळे शक्तीपीठ आणि औद्योगिक केंद्रे जोडली जातील. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील उद्योगांना चालना मिळेल. राज्यातील वाहतुकीचा वेग आणि सुविधा सुधारतील. पुरवठा साखळी मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शेतकऱ्यांना अधिक चांगल्या रीतीने बाजारपेठेपर्यंत पोहोचता येईल. “हा केवळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. (हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार तरी केव्हा? वरुण सरदेसाई यांच्या प्रश्नास आदिती तटकरे यांनी काय उत्तर दिले?)
दुसरीकडे, आझाद मैदानावर आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आणि ठाकरे गट आले होते. शक्तीपीठ महामार्गाविरोधात नेते आणि शेतकऱ्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शक्तीपीठ महामार्ग संघर्ष विरोधी समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी सांगितले की, शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही. बांधल्या जाणाऱ्या महामार्गाला समांतर दुसरा मार्ग असल्याने, नवीन मार्गाची आवश्यकता नाही. आम्ही शेतकऱ्यांनी महामार्ग बांधण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आम्ही आमच्या पूर्वजांच्या जमिनी सरकारला हिरावून घेऊ देणार नाही.