राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का; वाडा-शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा राजीनामा;  मातोश्रीवर होणार शिवसेना प्रवेश
NCP

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार पांडुरंग बरोरा (NCP MLA Pandurang Barora) यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आमदार बरोरा यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांकडे आज (मंगळवार, 09 जुलै 2019) सोपवला. विधानसभा निवडणूक 2019 तोंडावर आली असताना पक्षाच्या विद्यमान आमदाराने अशा प्रकारे राजीनामा देणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, आमदार बरोरा हे 2014 मध्ये मोदी लाटेतही निवडूण आले होते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते एकमेव आदीवासी आमदार होते. आमदार बरोरा हे लवकरच शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पांडुरंग बरोरा हे सर्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे गेल्याचे समजते.

आमदार पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. पवार काका-पुतणे आणि आमदार बरोरा यांचे संबंद हे गेल्या 40 वर्षांपासून सौहार्दाचे राहिले आहेत. त्यामुळे इतक्या घनिष्ठ नेत्याने पक्ष सोडणे हे धक्कादायक मानले जात आहे. (हेही वाचा, काँग्रेस पक्षात नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोडले सरचिटणीस पद)

NCP MLA Pandurang Barora | (फोटो सौजन्य-फेसबुक)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाडा-शहापूर विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल झाले होते. त्यात आमदार बरोरा हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना पक्षात प्रवेश करणार असे बोलले जात होते. काही मेसेजमध्ये तर 'आमदार बरोरा आषाढी एकादशीला भगवी पताका हातात घेणार', असे संकेतदर्शक संदेश दिले जात होते.