Crime | (File image)

तळोजा पोलीस (Taloja Police) एका ड्रायव्हरच्या शोधात आहेत ज्याने त्याच्या मालकाची एक धक्कादायक कबुली आपल्या फोनवर रेकॉर्ड केली आहे व त्याद्वारे तो मालकाला ब्लॅकमेल करत आहे. मालकाने दारूच्या नशेत आपल्या सावत्र मुलीसोबत असलेल्या त्याच्या अनैतिक संबंधांबद्दल 'कबुली' दिली होती. ही कबुली ड्रायव्हरने आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केली. यानंतर तो मालक आणि त्याची महिला लिव्ह इन पार्टनर यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळत होता.

पोलिसांनी सांगितले की, फरार चालकाने या दाम्पत्याकडून आतापर्यंत 10.70 लाख रुपये उकळले आहेत. इतके पैसे देऊनही चालक त्यांना ब्लॅकमेल करत राहिला. त्यानंतर या त्रासाला कंटाळून मालकाच्या महिला लिव्ह-इन पार्टनरने त्याच्याविरुद्ध तळोजा पोलिसात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, नवी मुंबईतील 45 वर्षीय महिला एका 55 वर्षीय व्यावसायिकासोबत लिव्ह-इनमध्ये राहात आहे. या महिलेच्या पतीने दुसऱ्या महिलेसाठी तिला सोडले होते.

महिलेला 27, 25, 23 आणि 19 वर्षांच्या चार मुली असून त्यापैकी मोठ्या दोन मुलींचे लग्न झाले आहे. ऑगस्टमध्ये ड्रायव्हरने त्याच्या मालकाच्या महिला पार्टनरला फोन करून सांगितले की, मालकाचे तिच्या तीन मुलींसोबत अवैध संबंध आहेत. आपल्याकडे याची कबुली असल्याची माहितीही चालकाने महिलेला दिली. त्यानंतर या महिलेच्या जावयाला ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवण्याची धमकी देत आरोपी ड्रायव्हरने महिलेकडे 10 लाख रुपयांची मागणी केली.

त्यानंतर महिलेने तिच्या लिव्ह-इन पार्टनरला याबद्दल विचारणा केली असता, त्याने कबूल केले की ड्रायव्हर त्याला आधीपासून ब्लॅकमेल करत होता. त्याने महिलेला सांगितले की ड्रायव्हरने त्याला मद्यप्राशन केले आणि त्याच्या व महिलेच्या मुलींबाबत चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या. या गोष्टी त्याने नकळत रेकॉर्ड केल्या. लिव्ह-इन जोडप्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यासाठी ड्रायव्हरने त्याच्या एका मित्राला या योजनेमध्ये सहभागी करून घेतले होते. (हेही वाचा: Pune Crime: मैत्रिणीस आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार करण्याचे स्वप्न दाखवत मित्राकडून पॉर्न वेबसाईटवर व्हिडीओ व्हायरल)

या दाम्पत्याने ड्रायव्हर आणि त्याच्या मित्राला तीन आठवड्यांमध्ये सुमारे 10.70 लाख रुपये दिले. परंतु एवढी मोठी रक्कम देऊनही, ड्रायव्हरने महिलेकडे स्वतंत्रपणे 6 लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले की, या जोडप्याने चालक आणि त्याच्या मित्राच्या बँक खात्यात 70 हजार आणि 4 लाख रुपये ट्रान्सफर केले. याशिवाय चालकाला सहा लाख रुपये रोख देण्यात आले. परंतु तरीही पैशांची मागणी न थांबल्याने त्यांनी पोलिसांकडे जाऊन एफआयआर दाखल केला. चालक व त्याचा मित्र फरार असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहे.