Sandeep Sawant | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

मराठा लाईट इंफ्रंट्रीमधील जवान संदीप सावंत यांनी जम्मू कश्मीरमध्ये वीरमरण आल्यानंतर आज (3 जानेवारी) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान 25 वर्षीय संदीप यांच्या पश्चात पत्नी आणि दीड महिन्यांची चिमुकली आहे. आज लष्करी इतमामामध्ये त्यांना अखेरचा सलाम देण्यात आला. तर संदीप सावंत यांच्या पार्थिवाला त्यांच्या दीड महिन्यांच्या चिमुकलीच्या हाताने मुखाग्नी दिल्याचं चित्र पाहून सारेच हळहळले. दरम्यान संदीप सावंत हे सातार्‍यातील कराड तालुक्यातील मुंडे गावाचे रहिवासी होते.

1 जानेवारी 2020 च्या पहाटे संदीप सावंत यांच्या टीमला नौशेरा परिसरात काही हालचाली दिसल्या. त्यावेळी ही दहशतवाद्यांची हालचाल दिसली. त्यांच्यासोबत झालेल्या चकमकीमध्ये संदीप सावंत यांना वीरमरण आले. संदीप यांच्यासोबतच नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर यांनादेखील वीरमरण आले आहे.  (हेही वाचा, भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर, पकिस्तानी सैन्याचे 3 ते 4 सैनिक ठार)

नौशेरा भागातील संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून नौशेरा भागातून पाकिस्तानकडून अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. हे उल्लंघन वर्षाखेर आणि नववर्षाच्या पहाटेही सुरु होते. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानेला नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले आहे.