सातारा: जम्मू सेक्टर येथील नौशेरा भागात झालेल्या चकमकीत जवान संदीप सावंत शहीद
Sandeep Sawant | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

जम्मू सेक्टर येथील नौशेरा (Naushera Sector) भागात झालेल्या चकमकीत लढताना सातारा येथील जवान संदीप सावंत (Sandeep Sawant) शहीद झाले आहेत. ते अवघे 25 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सविता आहेत. शहीद संदीप सावंत हे कराड (Karad) तालुक्यातील मुंडे (Munde Village) गावचे रहिवासी होत. अत्यंत धाडशी, मनमिळावू आणि एक उमदे व्यक्तिमत्व अशी संदीप सावंत यांची ओळख होती. त्यांच्याबाबतचे वृत्त येताच सावंत कुटुंबीय आणि मुंडे गावावर शोककळा पसरली.

2019 या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या पहाटे जवान संदीप आणि त्यांचा चमू नियंत्रण रेषेवर गस्त घालत होता. दरम्यान, नियंत्रण रेषेवर त्यांना हालचाली दिसल्या. अधिक काळजीपूर्वक पाहिले असता काही दहशतवादी सीमारेषेवरुन घुसखोरी करत असल्याचे पाहायला मिळाले. संदीप सावंत आणि आणि त्यांच्या चमूसह इतर सैनिकांचा चमूही तत्काळ सज्ज झाले. त्यांनी दहशतवाद्यांचा सामना करण्यास सुरुवात केली. मात्र, पहाटेचा अंधार आणि दाट धुके यांमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या समजू शकत नव्हती. अशा वेळी नाईक संदीप नाईक यांनी आघाडी घेत हल्ला चढवला. या वेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर गंभीर जखमी झाले. या दोघांनाही वीरमरण आले. (हेही वाचा, भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर, पकिस्तानी सैन्याचे 3 ते 4 सैनिक ठार)

या घटनेनंतर नौशेरा भागातील संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून नौशेरा भागातून पाकिस्तानकडून अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. हे उल्लंघन वर्षाखेर आणि नववर्षाच्या पहाटेही सुरु होते. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानेला नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले आहे.