भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर, पकिस्तानी सैन्याचे 3 ते 4 सैनिक ठार
Ceasefire Violation (Photo Credits: IANS)

Pakistani Soldiers Killed: पाकिस्तानी सैन्याने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराने (Indian Army) चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचे 3 ते 4 सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी सैन्याने पुंच-रजोरी सेक्टर (Rajouri Sector) येथे गुरुवारी रात्री अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी बॉम्बही टाकले. काही प्रमाणात तोफगोळेही टाकले. भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य बनवून प्रत्युत्तर दिले.

लष्करी सूत्रांचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, भारतीय लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानी सौन्याचे तीन ते चार जवान ठार झाले. भारतीय सैन्यानेही मोर्टार्सचा मारा केला. यात पाकिस्तानी सैन्याच्या काही चौक्या उद्ध्वस्त झाल्या. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या गोळीबारात एक भारतीय सैनिक शहीद झाला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने स्पष्ट केले होते की, पाकिस्तानकडून आता एकही भारतीय सैनिक शहीद झाला तर पाकिस्तानचे प्रत्येकी तीन सैनिक मारले जातील. (हेही वाचा, अयोध्या येथे दहशतवादी हल्ल्याची शक्यता- मीडिया रिपोट्स)

रामपूर सेक्टर येथे पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन बुधवारी झाले. या वेळी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सुबेदार वारीश कुरहाठी शहीद झाले. तसेच, एका स्थानिक महिलेचाही मृत्यू झाला होता. पाकिस्तानने बारामुला जिल्ह्यातील नागरी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. या ठिकाणी गोळीबारीचे निशाणही दिसत असल्याचे नागरिक सांगतात.