Heavy Rain In Satara: साताऱ्यात पावसाचा जोर वाढला, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत नवजा येथे 100 तर मान्सून सुरु झाल्यापासून आतापर्यंत एकूण 920 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. परिणामी कोयना धरणातील पाणीसाठ्याने 18 टीएमसीचे परिमाण गाठले आहे. सकाळी आठपर्यंतच्या 24 तासांत नवजा येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तर कोयना नगर आणि महाबळेश्वरला 100 मिलीमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाली. (हेही वाचा - Crocodile on Shivnadi Bridge: शिवनदी पुलावर मगरीचा मुक्त वावर, व्हिडिओ व्हायरल (Watch))

महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात देखील मान्सूनच्या पावसाने वेळेत एन्ट्री केली. मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पण नंतर काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आणि काही दिवसांसाठी तर पावसाने दडीही दिली. यामध्येच समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजासह कांदाटी खोऱ्यात पाऊस होत असल्याने ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरीही पावसाचा जोर कमीच आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होत असली तरी ती संथगतीने होत आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात 9 हजार 888 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा 18.26 टीएमसी झाला होता, टक्केवारीत हे प्रमाण 17.35 इतके आहे. तर धरणातील उपयुक्त पाणीसाठा 13.14 टीएमसी इतका आहे.