Satara District Bank Election Result: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक, शशिकांत शिंदे यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी
NCP Office Satara | (Photo Credit: YouTube)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याची काहीशी अनपेक्षीत घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा येथील कार्यालयावर ही दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारे लोक आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा करत होते. या दगडफेकीचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत (Satara District Bank Election Result) शशिकांत शिंदे यांचा केवळ एका मताने निसटता तितकाच धक्कादायक पराभव झाला. हा पराभव शशिकांत शिंदे यांच्या पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जीव्हारी लागला. त्यातून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी शशिकांत शिंदे हे जावळी सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा ज्ञानदेव रांजणे यांनी अवघ्या एका मताने पराभव केला. अनेकांसाठी हा पराभव धक्कादायक मानला जात आहे. शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच काही नेत्यांनी जाणीवपूर्वक शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांना अडचणीत आणले. शशिकांत शिंदे यांच्या पाठिशी उभे राहा असा पक्षाध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांचा आदेश असतानाही जिल्ह्यातील नेत्यांनी कुरघोडीचे राजकारण केले. त्यामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. (हेही वाचा, Satara District Bank Election Result: शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई पराभूत; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल अनेकांसाठी धक्कादाय)

जावळी सोसायटी गट निकाल

एकूण मते- 49

ज्ञानदेव रांजणे – 25 (विजयी)

शशिकांत शिंदे – 24 (पराभूत)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर दगदडफेक करणारे कार्यकर्ते हे 'शिकांत शिंदेंचा विजय असो' अशा घोषणा देत होते. तसेच, जिल्ह्यातील नेत्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात कट रचला. त्यामुळे आम्ही संतापातून ही दगडफेक करत असल्याचे सांगताना हे कार्यकर्ते व्हिडिओत दिसतात.