सातारा (Satara) मधील फलटण (Phaltan) तालुक्यातील काळज (Kalaj) गावातील चिमुकल्याचे अपहरण आणि हत्या या घटनेमागचं गुढ उलघडलं आहे. बाळाच्या आईवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याची कबुली खुद्द आरोपीने पोलिसांकडे दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिजीत लोखंडे (27) असे आरोपीचे नाव असून तो काळज पासून 4 किमी अंतरावर असलेल्या तडवळे गावात राहतो. बाळाच्या आईवर आपलं प्रेम होतं. परंतु, बाळामुळे ती प्रतिसाद देत नसल्याने बाळाचं अपहरण करुन त्याला विहीरत फेकलं, अशी कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे.
त्रिंबक दत्तात्रय भगत यांच्या मुलाचे तीन दिवसांपूर्वी घरातून अपहरण झाले होते. त्यानंतर काल त्याचा मृतदेह घराशेजारील विहीरीत आढळल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला. तसंच परिसरातही एकच खळबळ उडाली. भगत दांपत्यांना चार मुली आणि एक मुलगा होता. मुलगा घरात झोपलेला असताना आरोपी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास दुचाकीवरुन एका महिलेसोबत आला आणि घरात घुसला. कुणालाही कळायच्या आत बाळाला घेऊन पसार झाला. (Satara: फलटण तालुक्यातील काळज गावातून अपहरण झालेल्या बाळाचा मृतदेह सापडला; धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ)
अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर या घटनेचा तपास लोणंद पोलीस करत होते. बाळाला घेऊन जाताना दोघांना पाहिले असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. त्यातील पुरुषाने काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स तर महिलेने गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला असा अंदाजही ग्रामस्थांनी वर्तवला होता. दरम्यान, बाळाचा मृतदेह सापडल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण लागले. मात्र आरोपीच्या कबुलीनंतर घटनेवरील पडदा उठला आहे. (एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करुन आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न)
दरम्यान, एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्हांच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. अॅसिड हल्ले, हत्या, आत्महत्या अशा अनेक घटना समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेची चाकू भोकसून हत्या केली होती. त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.