सातारा (Satara) मधील फलटण (Phaltan) तालुक्यातील काळज (Kalaj) गावातून दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या बाळाचा मृतदेह घराशेजारील विहीरीत सापडला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी घरात झोपलेल्या 10 महिन्यांच्या बाळाचे दुचाकी वरुन आलेल्या जोडप्याने अपहरण केले. सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी करुन संशयितांचा शोध सुरु केला होता. या शोध मोहिमेसाठी 20 हून अधिक पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. मात्र घराशेजारील विहीरीतच बाळाचा मृतदेह सापडल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
फलटण तालुक्यातील काळज गावातील रहिवासी त्रिंबक दत्तात्रय भगत यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्यांना 4 मुली आणि एकुलता एक मुलगा होता. घरात घुसून अज्ञातांनी या बाळाचे अपहरण केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. (Kidnapping And Selling Case: अंबरनाथ येथे अडीच वर्षीय मुलाचे अपहरण करून चक्क 70 हजारांना विकले; एका महिलेसह 5 जणांना अटक)
बाळाला नेत असल्याचे पाहुन भगत यांच्या मोठ्या मुलीने आरडा ओरड केला. मात्र तोपर्यंत अज्ञात जोडप्याने बाळाला घेऊन तेथून पळ काढला होता. या अज्ञात जोडप्यातील पुरुषाने काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली होती. तर महिलेने गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस तपास करत होते. तसंच यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्याच लोणंद पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले होते. (Thane Rape Case: अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कारप्रकरणी ठाण्यातील 19 वर्षीय तरुणाला अटक)
मात्र घराशेजारील विहिरीत बाळाचा मृतदेह आढळल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेवरुन गावातही सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. लवकरात लवकर दोषींना शिक्षा होईल, अशी आशा आहे.