एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करुन आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या पोटात चाकू भोकसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हेतर आरोपीने स्वत:च्याही पोटात चाकू भोकसून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना अमरावती ( Amravati) जिल्ह्यातील धामणगाव (Dhamangoan) रेल्वे येथे घडली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी गंभीर जखमी आहे. आरोपीला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तरुणीने आपल्या प्रेमाला नकार दिल्याच्या नैराश्यातून आरोपीने तिला ठार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

मृत तरूणी ही अमरावती जिल्ह्यातील रहवाशी असून इयत्ता 12वी मध्ये शिकत होती. तसेच आरोपी आणि तरुणी एकाच परिसरात राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे संबंधित तरुणीवर प्रेम होते. यामुळे आरोपीने तरुणीकडे विचारणादेखील केली होती. परंतु, तरुणीने नकार दिल्यामुळे आरोपी संतापला आणि त्याने तरुणीला ठार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, तरुणाने गार्डनमध्ये बसलेल्या तरुणीवर चाकू हल्ला केला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने स्वत:वरही चाकूने वार करुन स्वताचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शनी लोकांनी स्थानिक पोलिसात याची माहिती दिली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. हे देखील वाचा- मुंबई: सहकारी तरुणी कपडे बदलत असताना तिचे चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यास अटक

या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाला असून पुन्हा एकदा महिला सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः ज्या पालकांच्या मुली शाळा-महाविद्यालयात जात आहेत, त्यांच्याकडून आपल्या पाल्यांविषयी अधिक काळजी व्यक्त केली जात आहे.