सहकारी तरुणीचे कपडे बदलाताना चोरुन मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील पवई (Powai) परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरूणी आणि आरोपी दोघही एकमेकांना ओळखत असून दोघेही एकाच घरात नोकर म्हणून काम करित आहेत. पीडित तरुणी कपडे बदलण्यासाठी बाथरुममध्ये गेली असताना तिला आरोपीचा मोबाईल सापडला. दरम्यान, मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग चालू असल्याचे पीडिताच्या लक्षात आले. यामुळे हा सर्वप्रकार उघडकीस आला.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदीप रॉय असे आरोपीचे नाव असून पवई येथील एका घरात गेल्या अनेक दिवसांपासून तो जेवण बनवण्याचे काम करत होता. पीडित तरुणीही याच घरात कामाला असून मालकिणीच्या मुलाचा संभाळ करण्याची जबाबदारी तिच्याकडे होती. पीडित तरुणीला राहण्यासाठी वेगळी खोली देण्यात आली होती. मात्र, नोकरांसाठी स्वच्छतागृह एकच होते. दरम्यान, पीडित तरुणी आपले कपडे बदलण्यासाठी गेली असताना तिला काहीतरी चमकत असल्याचे दिसले. त्यामुळे पीडिताने जवळ जाऊन पाहिले तर, तिला प्रदिपचा मोबाईल सापडला. तसेच त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग सुरु असल्याचे तिला कळाले. पीडिताने ही बाब आपल्या मालकिणीच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात प्रदिप विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हे देखील वाचा-ठाणे: बदलापूर शहरातील एका फ्लॅटमध्ये सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदिप गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शुट करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच स्थानिक पोलीस प्रदिप याचा मोबाईलही तपासणार आहेत. मुंबईत अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. यामुळे मुलींनी नेहमी सावधानीत राहावे, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येतात.