Satara: औरंगजेबानंतर आता साताऱ्यातील अफझलखानच्या कबरीवर सुरक्षा वाढवली; राज ठाकरे यांनी केले होते वादग्रस्त वक्तव्य
अफझलखान कबर (संग्रहित संपादित प्रतिमा)

औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवल्यानंतर आता राज ठाकरेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातारा (Satara) जिल्ह्यातील प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानच्या कबरीवरही (Afzal Khan's Tomb) सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ठाकरे यांच्या वक्तव्यापूर्वी येथे दररोज 10 पोलीस तैनात केले जात होते, परंतु आता 102 बटालियन रॅपिड अॅक्शन फोर्स मुंबईचे सहाय्यक कमांडर स्वप्नील पाटील आणि त्यांचे 50 जवान आणि 15 क्यूआरटी कर्मचारी या ठिकाणी देखरेख करतील.

22 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत सांगितले होते की, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या अफजलखानाला महाराजांनी मारले. मात्र त्याची 4×6 फुटांची कबर आहे, आज तिथे मशीद बांधली आहे. या वक्तव्यानंतर सातारा पोलीस सतर्क झाले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणाची पोलिसांनी पाहणी केली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी महाबळेश्वरमधील विविध समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक बोलावली.

पोलिसांनी महाबळेश्वर आणि परिसरातील नागरिकांना शांततेचे आवाहन करून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. आता या कबरीच्या आसपासची सुरक्षा वाढवली गेली आहे. याबाबतचे निवेदन देताना साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणाले, ‘अफजलखानची कबर हे 2005 पासून प्रतिबंधित क्षेत्र आहे. या ठिकाणी अतिरिक्त दलाची भेट ही नित्याच्या प्रक्रियेचा एक भाग होती ज्यात ते सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठी संवेदनशील ठिकाणांना भेट देतात. यावेळी मुल्यांकन दौरा महाबळेश्वरमध्ये होता, तेथे त्यांनी प्रतापगडला भेट दिली.’ (हेही वाचा: 'मनसेने राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी', राज ठाकरे यांच्यावर रोहित पवार यांचा थेट निशाणा; फेसबुक पोस्ट चर्चेत)

दरम्यान, आदिलशहाचा सरदार अफजलखान छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी प्रतापगडावर आला होता, पण शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ठार मारून त्याच्या सैन्याचा नाश केला. या लढाईला इतिहासात खूप महत्त्व आहे. अफझलखान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू असेल, पण त्याच्या मृत्यूनंतर त्यांनीच अफझलखानला प्रतापगडच्या पायथ्याशी गाडून तिथे त्याची कबर बनवली. याआधीही 2004 मध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून अफझलखानाच्या कबरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. आताही अशी घटना घडू नये म्हणून सातारा पोलीस आता अलर्ट मोडवर आहेत.