Nitesh Rane | (Photo Credits: Facebook)

“समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है” असे कॅप्शन देत माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) आणि विद्यमान गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे फोटो असे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचे ट्विटर काल (3 फेब्रुवारी) सकाळी जोरदार चर्चेत राहिले. पण त्यानंतर अशा काही घटना घडल्या की, नितेश राणे यांनी अवघ्या 24 तासांच्या आत हे ट्विट आपल्या अकाऊंटवरुन डिलिट केले आहे. त्यामुळे नितेश राणे यांना हे ट्विट महागात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही सुरु झाली आहे. संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरणात नितेश राणे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack Case) नितेश राणे सिंधुदुर्ग कोर्टाला शरण आले. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला. त्यानंतर लगेचच नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. नितेश राणे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे. तसेच, कोकणातील विविध ठिकाणी नेऊनही त्यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे तपासाच्या निमित्ताने नितेश राणे यांचे कोकण दर्शन होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (हेही वाचा, Nitesh Rane to Police Custody: नितेश राणे यांना सिंधुदुर्ग न्यायालयाचा धक्का, दोन दिवसांची पोलीस कोठडी)

विद्यमान केंद्रीय मंत्री अमित शाह यांना 2009 मध्ये अटक झाली होती. त्या वेळी पी. चिदंबरम हे देशाचे गृहमंत्री होते. पुढे अमित शाह हे केंद्रीय मंत्री असताना पी. चिदंबरम यांना अटक झाली. अर्थात दोघांवर असलेले आरोप आणि प्रकरणेही वेगवेगळी असली तरी नितेश राणे यांनी त्याचा संबंध काळासोबत जोडत दोघांचे फोटो ट्विट केले. नितेश राणे यांनी ट्विट करत एक प्रकारे इशाराच दिला होता की, काळ बदलत असतो. उद्या जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा आम्हीहीतुम्हाला अशाच प्रकारची वागणूक देऊ, असा इशाराच जणून नितेश राणे हे या ट्विटमधून देऊ इच्छित होते. पण या ट्विटची चर्चा झाली खरी. परंतू, गल्लीतला वाद दिल्लीत नेल्याने नितेश राणे यांना हे ट्विट डिलिट करावे लागले आहे.