Sanjay Raut on Raj Thackeray:  राज ठाकरे यांचा 'भोंगा' ईडीचे अभय मिळाल्याने वाजतोय, संजय राऊत यांचा पलटवार
Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

'लवंडे' असा उल्लेख करत तीव्र शब्दांमध्ये टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र सरकारने 'ईडी' (ED) कारवाईपासून अभय दिल्यानेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा भोंगा आता अधिक जोरात वाजतो आहे. आमच्याशी थेट लढण्याची धमक भाजपमध्ये नाही. त्यामुळेच भाजप असले भोंगे वापरुन माहोल तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही ईडीच्या कसल्याच कारवाईला घाबरत नाही. आम्ही ईडी कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहोत. आमचा हा लढा आहे त्यामुळे आम्हाला त्याची चिंता वाटत नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते मुंबई यथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे यांच्या ठाणे येथील उत्तरसभेचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्ही कितीही आमच्यावर टीका करा, नकला करा, खोटं बोला महाविकासआघाडीवर परिणाम होणार नाही. शिवसेना आणि महाविकासआघाडी भक्कम आहे. हे सरकार भक्कमपणे काम करेन. कितीही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडी सरकार पडत नाही. ह पाहून अनेकांना नैराश्य आले आहे. त्यातून आता असले भोगे वाजू लागले आहेत. भाजपचे भोंगे लावून उपयोग झाला नाही. त्यामुळे आता हे बाहेरचे भोंगे लावले जात असल्याची टीकाही संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. (हेही वाचा, Mumbai: मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावल्याने भाजप आमदारांच्या भावावर गुन्हा दाखल)

राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर विचारले असता राज्य सरकारला अल्टिमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती. आता कोणी राज्य सरकारला अल्टीमेटम देऊ शकत नाही. बाळासाहेबांनी या देशातील अतिरेक्यांनाही अल्टीमेटम दिला होता. वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेवरुनही अल्टिमेटम देण्याची ताकद आणि कुवत फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती. त्यामुळे आज अल्टीमेटमचा जो भोंगा वाजू लागला आहे. तो भाजपचा भोंगा असल्याची टीकाही राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.