Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ आता मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) देखील ईडीच्या ( ED) रडारवर आले आहेत. काल (27 डिसेंबर) संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीची नोटीस मिळाल्याचं वृत्त आहे. दरम्यान यावर आज सकाळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, 'ईडीने बजावलेली नोटीस अजून मिळाली नाही. भाजपा नेते त्याबद्दल बोलत आहेत. सध्या माझा एक माणूस ईडी कार्यालयात पाठवला आहे. कदाचित नोटीस ही भाजपा कार्यालयात अडकली असेल' असं म्हणत आपली खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. दरम्यान या बाबत आज दुपारी 2 वाजता सेनाभवनात संजय राऊत पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया देणार आहेत.

संजय राऊत यांच्या पत्नींना काल पीएमसी घोटाळा प्रकरणी नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचं सांगितले आहे. त्यानंतर राऊतांनी देखील काल ट्वीटरवर ' किसमे कितना है दम' म्हणत एक सूचक ट्वीट केलं होतं. मात्र सविस्तर बोलणं अद्याप टाळलं आहे. त्यामुळे आज दुपारी संजय राऊत काय बोलणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागणार आहे. Sanjay Raut Tweets: पत्नीला ईडीने नोटीस पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिले 'हे' आव्हान.

संजय राऊत यांच्या ईडी नोटीसीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया, चूकीचं काम केले नसेल तर घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडी मधून मात्र भाजपा ईडी नोटीशींचा हत्यारांसारखा वापर करत असल्याचं म्हटलं आहे. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया देताना हे राजकीय दबावा तून होत असलं तरीही महाविकास आघाडी मजबूत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

महिन्याभरापूर्वी टॉप्स सिक्युरिटीमधील आर्थिक गैर व्यवहाराबद्दल प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ काही महिन्यांपूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंना ईडीने नोटीस बजावली आहे तर आता त्यापाठोपाठ संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊतांना ईडीने नोटीस दिली आहे.