Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. आमच्याकडे लपविण्यासारखे काहीच नाही. आम्ही खुल्या पुस्तकाप्रमाणे आहोत. त्यामुळे आमच्याकडे जे आहे ते आम्ही सांगत असतो. ज्यांच्याकडे लपविण्यासारखे असते ते लोक भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करतात. या आधीही अनेकांनी असे प्रवेश केले आहेत, असा टोला शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकाकारांना लगावला आहे. तसेच, आम्ही कोणाच्या दबावाला बळी पडत नाही. आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेतच मरणार, अशी भावनाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने ( Enforcement Directorate) नोटीस पठवली आहे. या नोटीशीबाबत संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या वेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळ्या डेटलाईन दिल्या जात आहेत. या आधीही त्या देण्यात आल्या होत्या. सर्व प्रयत्न करुनही हे सरकार पडत नाही, हे पाहल्यावर दबावाचे प्रयत्न केले आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. आपण कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही. मला धमकी देणारा अद्याप जन्माला यायचा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Enforcement Directorate: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त)

दरम्यान, ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास वर्षा राऊत यांनी काहीसा कालावधी मागीतला आहे. त्यामुळे आज त्या ईडी कार्यालयात जाऊ शकणार नाहीत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. या वृत्तास राऊत यांनी दुजोरा दिला. तसेच, ईडीचा तो कोगद आम्हाला मिळाला आहे. परंतू मी तो कागद अद्याप पाहिला नाही. ईडीने ही नोटीस पाठवली असली तरी आम्ही त्याचा आदर करतो. शेवटी तीही एक स्वतंत्र संस्था आहे. आपण अशा संस्थांचा आदर करायला हवा. परंतू, गेल्या काही काळात ईडी ज्या प्रकारचे वर्तन करत आहे. ते पाहता मला ईडीची किव येते. ईडीला, सीबीआय, एनसीबी यांसारख्या संस्थांना पूर्वी एक नाव होते. त्यांची एक प्रतिष्ठा होती. परंतू, अलिकडील काळात या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही संजय राऊत यांनी या वेळी म्हटले.