Sanjay Raut, Varsha Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात आज उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे. ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी राऊत कुटुंबीयांकडून अधिकचा वेळ मागितला असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. प्राप्त नोटीशीनुसार वर्षा राऊत यांना आज (29 डिसेंबर) ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही कालच्या (28 डिसेंबर) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली होती.

प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, वर्षा राऊत यांच्याकडून ईडी कार्यालयाला काल (29 डिसेंबर) एक पत्र देण्यात आले. या पत्रामध्ये चौकशीला सामोरे जाण्यासाठी आणखी काही वेळ वाढवून मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी वकिलांशी चर्चा करण्यास आणि इतर तयारी पूर्ण करण्यास वेळ मिळावा अशी मागमी वर्षा राऊत यांनी केल्याचे समजते. आता राऊत कुटुंबीयांनी केलेली मागणी मान्य करत ईडी वर्षा राऊत यांना वेळ वाढवून देणार की त्यांची मागणी फेटाळणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, ED Office: शिवसैनिक आक्रमक! मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोरच लावला ‘भाजप प्रदेश कार्यालय' लिहलेला बॅनर)

संजय राऊत यांनी पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या नोटीशीवरुन कालच्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजप आणि ईडी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपच्या 120 नेत्यांची यादी आपल्याकडे आहे. आपण तोंड उघडले तर केंद्रातील सरकारमध्ये खळबळ उडेल. परंतू, मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मला मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत आपली लढाई समोरासमोर लढायची. पाठिमागून वार करायचे नाहीत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मुले, कुटुंब यांपर्यंत पोहोचायचे नाही, असे राऊत यांनी सांगितले.

पुढे बोलताना राऊत यांनी म्हटले की, ईडी ही भाजपची शाखा असल्यासारखे काम करत आहे. ईडी कार्यालयात कोणालाही सहजासहजी परवानगी मिळत नाही. परंतू, भाजपचे तीन नेते गेले महिनाभर ईडी कार्यालयात वारंवार जात होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला इडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी भाजप कार्यालय असा फलक लावल्याचे पाहायला मिळाले. जो नंतर हटविण्यात आला.