संजय राठोड यांना क्लिनचीट; शरीरसुखाच्या मागणीचा आरोप ठरला खोटा
Sanjay Rathod (Photo Credits: Facebook)

यवतमाळ पोलिस स्टेशनमध्ये पत्र पाठवून माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. परंतु, यात कोणतेही तथ्य नसल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना क्लिन चीट (Clean Chit) देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी एसआयटीची स्थापन करुन पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर संजय राठोड यांचाही जबाब नोंदवण्यात आला. (संजय राठोड यांच्यावर अजून एक आरोप; शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार)

चौकशीदरम्यान या महिलेने स्वत: पत्र पाठवलेले नसून त्यात त्यांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले. तसंच पत्रातील सही आणि पतीचे नावही खोटे असल्याचे महिलेने सांगितले. आमदार संजय राठोड यांच्याविषयी कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी कबुल केले. त्यांच्या नावाचा वापर करत कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे महिलेने म्हटले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली. तसंच या प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले.

14 ऑगस्ट रोजी सदर महिला वडली, भाऊ आणि पती सोबत पोलिस स्थानकात उपस्थित झाल्या होत्या. मात्र त्यांची मनस्थिती ठीक नसल्याचे आढळून आल्याने महिलेच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांची कॅमेरा विचारपूस करण्यात आली होती. त्या चौकशीत त्या महिलेचा आणि कुटुंबियांचा पत्राशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले. त्यामुळे संजय राठोड यांच्याविरोधातील तक्रार आणि आरोप खोटे असल्याचे विशेष चौकशी पथकाने सांगितले.

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे पत्र ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत संजय राठोड यांच्यावर आरोप केल्याचे म्हटले होते. मात्र या प्रकरणी संजय राठोड यांना क्लिनचीट मिळाली असली तरी पूजा चव्हाण प्रकरणी त्यांच्यावरील आरोप कायम आहेत.