Sambhaji Bhide | Twitter

महात्मा गांधी संदर्भातील वादग्रस्त वक्तव्या विरोधात संभाजी भिडेंविरोधात सध्या राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे.संभाजी भिडेच्या अटकेसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ सुरू आहे. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतच संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर भिडे यांना असेल तिथून उचलून अटक केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. (हेही वाचा - Nitin Desai Suicide Case: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांचा सार्‍या बाजूने तपास होणार - Raigad SP Somnath Gharghe यांची माहिती)

दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे आणि राज्यसरकारवर जोरदार टिका केली आहे. संभाजी भिडे बोगस माणूस आहे. अनेक ठिकाणी जाऊन राज्यातील समाजसेवक आणि देव देवतांवर वादग्रस्त वक्तव्य करत असताना देखील त्याला पोलीस संरक्षण दिले गेलंय. ज्या अर्थी सरकार कुठलीही कारवाई करत नाही त्यामागे पोलिसांचे संरक्षण त्याला मिळालेलं आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाणांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. भिडेला कोणतीही सुरक्षा पुरवली नसल्याचे फडणवीस म्हणाले.

संभाजी भिंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका काही थांबता थांबत नाही. आधी 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, त्यानंतर आता महात्मा गांधी यांचे वडील मुस्लीम होते, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले . या प्रकारानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संताप व्यक्त करून संभाजी भिडे यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हे दाखल झाले आहेत.