School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट सावरत 9-12 चे वर्ग नियमित सुरू झाल्यानंतर आता आज (27 जानेवारी) पासून राज्यभर 5 वी ते 8वीचे वर्ग देखील सुरू होत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर शिक्षकांना त्यांचे आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्ट्स देखील निगेटिव्ह असल्याचा दाखला सादर करावा लागणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये आता 1ली ते चौथीचे वर्ग देखील सुरू करण्याचा विचार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

मुंबई मध्ये मात्र अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. बीएमसीने 16 जानेवारीला पुढील माहिती मिळेपर्यंत शाळा पुन्हा सुरू न करण्याचे निर्देश दिले आहेत. पण ठाणे ग्रामीण मध्ये मात्र आजपासून शाळा सुरू करण्यास मान्यता आहे. या शाळा आज विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यापूर्वी त्या संपूर्ण सॅनिटाईज केलेल्या असाव्यात. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मास्क बंधनकारक असावा तसेच अन्य काळजी घेऊन सुरक्षित वातावरणात शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. Varsha Gaikwad On School Reopening: इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा कधी सुरु होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती.

महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गत 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यात 9-12 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र जिल्हानिहाय परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकार्‍यांना आहे. ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्या असल्या तरीही ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक मध्ये मात्र चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

दिवसागणिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षण मंडळाने यंदाच्या 10वी आणि 12वी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावर्षी या परीक्षा एप्रिल - मे महिन्यात होणार आहेत.