RSS ची तालीबान सोबत तुलना; गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
Javed Akhtar | (Photo Credits: Twitter)

गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्वयंसेवक विवेक चंपानेरकर (Vivek Champanerkar) यांनी दीवानी खटला दाखल केला आहे. ठाणे कोर्टात (Thane Court) हा दावा दाखल करण्यात आला आहे. जावेद अख्तर यांनी आरएसएस आणि तालीबान यांची तुलना करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन चंपानेरकर यांनी खटला दाखल केल्यानंतर जावेद अख्तर यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. सदर प्रकरणाच्या सुनावणीसाठी 12 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश न्यायालयाने अख्तर यांना दिले आहेत.

जावेद अख्तर यांच्या या विधानानंतर महाराष्ट्र भाजपने अनेकदा आंदोलन केले आहे. महाराष्ट्र आमदार आणि भाजप प्रवक्ता राम कदम यांनी घोषणा केली आहे की, आपल्या विधानाबाबत माफी मागत नाहीत तोवर आम्ही जावेद अख्तर यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. जावेद अख्तर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, तालीबान आणि 'ज्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे' ते समान विचारांचे आहेत. आरएसएस ही भाजपची वैचारीक मातृसंघटना आहे. प्रदीर्घ काळापासून हे मानले जात आहे की, भारत एक हिंदू 'राष्ट्र' किंवा राज्य आहे. (हेही वाचा, Nitesh Rane On Javed Akhtar: जावेद अख्तर यांना भाजपा आमदार नितेश राणे यांचा इशारा, म्हणाले 'एक आठवड्यात स्पष्टीकरण द्या')

ट्विट

दरम्यान, राम कदम यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत म्हटले आहे की, जावेद अख्तर यांचे विधान अत्यंत अपमानस्पद आहे. आरएसएस आणि विहिंपच्या तसेच त्यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या करोडो लोकांचा अपमान आहे. दुसऱ्या बाजूला जावेद अख्तर यांचा आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यात एक खटला सुरु आहे. कंगना रनौत हिने केलेल्या टिप्पणीवरुन जावेद अख्तर यांनी मानहानीचा खटला दाखल कला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.