बॅंक ऑफ महाराष्ट्रावर (Bank of Maharashtra) दरोडा पडल्याची घटना आज उघडकीस आली आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या वरोरा (Warora) तालुक्यातील टेमुर्डा (Temurda) येथील बॅंकेत हा दरोडा पडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी अंदाजे 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने लंपास केल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी फोडल्याचे दिसताच स्थानिक नागरिकांनी वरोरा पोलिसांना कळवले. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास दरोडा टाकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी चोरट्यांनी लोखंडी ग्रील गॅस कटरच्या साह्याने तोडल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर बॅंकेच्या इमारतीच्या मागच्या बाजूला गॅस सिलिंडर पडल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच त्यांना शोधण्यासाठी शहरात नाकाबंदीदेखील करण्यात आली आहे. या दरोड्यात प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा- मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाही दादर मार्केटमध्ये नागरिकांची तोबा गर्दी (See Pics)
महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्राचा गुन्हेगारीच्या यादीत संपूर्ण देशातून आठवा क्रमांक लागत असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती 'क्राइम इन महाराष्ट्र, 2019' या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार, राज्यात 2018च्या तुलनेत जबरी चोरीच्या गुन्ह्यांत 4.48 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले आहे.