भारत पाक सीमेवर काल झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतरच्या संघर्षामध्ये महाराष्ट्रातील दोन वीर जवानांना मरण आले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामधील बहिरेवाडीचे ऋषिकेश जोंधळे तर नागपूरचे भूषण सतई हे दोन वीरजवान शहीद झाले आहे. भारतामध्ये दिवाळीचं पर्व सुरू असताना दुसरीकडे सीमेवर संघर्षाचं वातावरण आहे.
शहीदांमधील ऋषिकेश जोंधळे हे अवघे 20 वर्षांचे होते. त्यांनी 11 जून दिवशी सैन्यामध्ये सेवे देण्यास सुरूवात केली होती. ऐन दिवाळीमध्ये त्यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकल्याने त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. ऋशिकेष राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्या माध्यमातून त्यांची भारतीय लष्करात भरती झाली होती मात्र काल झालेल्या संघर्षात त्यांना वीरमरण आले आहे. दरम्यान या दोन्ही वीरांना मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
उदयनराजे भोसले
संपूर्ण देश दिवाळी साजरी करत असताना ऐन दिवाळीमध्ये ऋषीकेश जोंधळे व भूषण सतई वीरजवान शहीद झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या प्राणाची बाजी लावून हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना सलाम व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/QKPGlY9v3M
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) November 14, 2020
चित्रा वाघ
देशाचे रक्षण करताना जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामधील बहिरेवाडीचे सुपुत्र ऋषिकेश रामचंद्र जोंधळे शहीद झाले आहेत.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
जोंधळे कुटुंबियांवर ऐन दिवाळीत कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत🙏
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 14, 2020
काल सीमारेषेवर झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज राजस्थानमध्ये जैसलमेर मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करणार आहेत.