Corona Vaccination: केंद्र सरकारने लसीकरणासाठी ठेवलेली वयाची अट काढावी; ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
Hasan Mushrif, Narendra Modi (Photo Credit: Facebook)

देशभरात कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाविरोधी लसीकरणाच्या कार्यक्रमाचे टप्प्याटप्प्याने नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्वात आधी ही लस देण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जेष्ठ आणि अन्य आजाराने ग्रस्त असलेल्या 45 ते 59 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकारने (Central Government) लसीकरणासाठी ठेवलेली वयाची अट काढून टाकावी. तसेच सर्व नागरिकांसाठी लसीकरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामविकासमंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली आहे.

हसन मुश्रीफ यांनी काल (29 मार्च) अहमदनगर येथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता. दरम्यान ते म्हणाले की, केंद्र सरकार लसीकरणासाठी विविध बंधने घालीत आहे. अशी बंधने नकोत, लसीकरण सर्वांसाठी खुले करा. येईल त्याला टचाटच लस टोचण्यात यावी. त्यानंतर जे राहतील त्यांनाही शोधून लस द्या, अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करीत असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. यापूर्वी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला तरी नागरिक घाबरत होते. परंतु, आता लोकांच्या मनातील भिती नष्ट झाली आहे. हाच खरा धोका आहे. कारण, नियम केले जात असतानाही काही लोक प्रतिसाद देत नाहीत. आपल्यासाठी पुढील 100 दिवस महत्वाचे आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असल्याने काळजी घेण्याची गरज आहे, असेही मुश्रीफ म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Abhijit Bichukale पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात; पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी दाखल केला अपक्ष म्हणून अर्ज

महाराष्ट्रात काल (29 मार्च) रोजी 31 हजार 643 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 20 हजार 854 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 23 लाख 53 हजार 307 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3 लाख 36 हजार 584 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.71% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.