शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांच्या मंदिराची (Saibaba Mandir) कीर्ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या अनुषंगाने मंदिर संस्थेचे उत्पन्नही वाढत आहे. सन 2018-19 मध्ये शिर्डी मंदिर ट्रस्टची एकूण कमाई 689.43 कोटी रुपये इतकी आहे, जी 2017-18 मध्ये 431 कोटी इतकी होती. मात्र उत्पन्नासोबतच मंदिराचा खर्चही वाढला आहे. शिर्डी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान असून, इथे जगभरातील भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. एसएसटीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत विविध स्वरूपात देणगीद्वारे सुमारे 287 कोटी रुपये साई चरणी दान करण्यात आले आहेत.
यासोबतच या पैशांवर मिळालेले व्याज, पावती द्वारे जमा झालेले दान, ऑनलाईन, अन्न दान निधी, लाडू वाटप अशा प्रकारे मंदिराला एकूण 689.43 कोटी रुपये मिळालेले आहेत. देणगीमध्ये सुमारे 19 किलो सोन्याचे दागिने, नाणी व इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, देणगी म्हणून 391 किलो चांदी प्राप्त झाली आहे. परकीय चलन म्हणून एकूण 10.58 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. नवीन वर्ष सुरु होण्याआधीच्या फक्त 4 दिवसांत साईचरणी जवळजवळ 300 कोटीचे दान जमा झाले आहे. (हेही वाचा: शिर्डीमधून का गायब होत आहेत लोक? मानवी तस्करी नाही, तर 'हे' आहे कारण; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण)
संस्थेने वार्षिक अहवालात सामाजिक कार्याचाही उल्लेख केला आहे. नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी, संस्थेने 35 कोटी, 28 लाख रुपये दिले आहेत. भवानी माता सेवा समिती नागपूरच्या नेत्र रेडिओलॉजी आणि कार्डियोलॉजी विभागासाठी 2 कोटी, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय व रुग्णालय यवतमाळ यांना एमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी 13 कोटी रुपये. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला 15 कोटी रुपये देण्यात आले. याशिवाय गरीब गरजू रूग्णांना 20 कोटी 21 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. केरळच्या पुरासाठी संस्थेने 55 कोटी रुपये दिले आहेत। अशाप्रकारे ट्रस्टने अनेक सामाजिक कार्यांना हातभार लावला आहे.