नाशिक जवळील इगतपूरी रेव्ह पार्टी प्रकरणी (Nashik Igatpuri High Profile Rave Party) ) नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळ (Heennaa Panchaal) हिला पोलिसांकडून अटक झाली आहे. इगतपूरी रेव्ह पार्टी प्रकरणी नाशिक पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतले. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. त्यानंतर बराच वेळ गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, पोलिसांनी केलेली कारवाई आणि अटक करण्यात आलेल्यांची नावे आता पुढे येऊ लागली आहेत.
हिना पांचाळ हे मराठी, काही प्रमाणात हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन इंडस्ट्रीत परिचयाचे नाव आहे. हिना पांचाळ या आधी ‘बिग बॉस मराठी’ या टीव्ही शोमध्ये झळकली आहे. बिगबॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात तिने वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळवली होती. याशिवाय तिने हुक्का, बेबो बेबो, मोहल्ला, बोगन, राजू ओ राजू, अशा काही चित्रपटात आणि काम केले आहे. तर काही मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटात तिने आयटम सॉन्गही केली आहेत. याशिवाय तिला अभिनेत्री मलायका अरोराची लूक-अलाईक म्हणूनही ओळखले जाते. (हेही वाचा, Nashik Rave Party: इगतपुरी मध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; बिग बॉस फेम महिला अभिनेत्रीसह 22 जण ताब्यात)
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी कोणाची तरी एकाचा वाढ दिवस होता. वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ही रेव्ह पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी हे सर्व जण एकत्र जमले. पोलिसांना या रेव्ह पार्टीबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पाहणी केली असता मिळालेली माहिती खरी असून, पार्टी सुरु असल्याचे निष्पन्न झाले. इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर काही लोक, हुक्का आणि ड्रग्जचे सेवन करत होते. काही जण बेधुंद झाले होते. काही लोग नाचगाणी करत होते.
नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या एका पथकाने कारवाई करत 22 जणांना ताब्यात घेतले. या वेळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांना ताब्यात घेतले. यात इटालियन महिला, बॉलिवूडच्या दोन महिला कोरिओग्राफर, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री यांचा समावेश आहे. पोलिसांची कारवाई होत असल्याचे ध्यानात येताच काही लोकांनी येथून पळ काढला. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.